सात ते आठ टक्क्याने पैसे देतो सांगून पैसे उकळले, 1 कोटी रुपये घेऊन फरार, महाराष्ट्र पोलिसांनी उत्तर प्रदेशातून शोधून काढलं
शेअर बाजारात पैसै गुंतवणूक करुन सात ते आठ टक्के दराने व्याज देतो, असे आमिष दाखवून अनेकांना लुबाडणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.
कल्याण (ठाणे) : शेअर बाजारात पैसै गुंतवणूक करुन सात ते आठ टक्के दराने व्याज देतो, असे आमिष दाखवून अनेकांकडून पैसे घेऊन पसार झालेल्या भामट्याला डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद येथून अटक केली आहे. आरोपीचं नाव चंकेश जैन असं आहे. आतापर्यंत चंकेश जैन या तरुणाने एक कोटीची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
नेमकं प्रकरण काय?
डोंबिवली पूर्व भागातील बालाजी मंदीर रोड परिसरात राहणारा चंकेश जैन या तरुणाने दोन वर्षांपूर्वी लाोकांकडून पैसे घेतले होते. पैसे गुंतवा त्याच्या मोबदल्यात सात ते आठ टक्के व्याजाने पैसे परत घ्या, असे आमिष दाखवून पैसे उकळले होते. हे सर्व पैसे चंकेश याने शेअर बाजारात गुंतविल्याचे अनेकांना सांगितलं होतं. चंकेशच्या आमिषाला बळी पडून अनेकांनी त्याला पैसे दिले होते. त्याने काही जणांना ठरलेल्या व्याज दरानुसार पैसे परत केले. त्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला.
पोलिसांनी आरोपीला कसं शोधलं?
चंकेश दिसत नसल्याने त्याच्याकडे पैसे दिलेल्या नागरिकांना संशय आला. त्यांनी त्याचा शोध घेतला. पण तो सापडलाच नाही. अखेर त्यांनी डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीस ठाण्यात केली. डोंबिवलीचे एसीपी जे. डी. मोरे आणि टिळकनगरचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नारायण जाधव यांच्यासह पोलीस अधिकारी वैभव चुंबळे यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांकडे चंकेशचा काही एक सुगावा नव्हता. त्याचा मोबाईल नंबरसुद्धा बंद होता.
अखेर आरोपीला बेड्या
चंकेशचा शोध घेत असताना पोलीस चंकेशच्या एका जवळच्या व्यक्तीला भेटले. या व्यक्तीला भेटल्यानंतर चंकेश कुठे आहे, त्याचा फोननंबर नेमका कुठला सुरु आहे? याची चौकशी केली. अखेर चंकेशचा मोबाईल नंबर पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी टेक्नीकल पद्धतीने या प्रकरणाचा तपास करीत आरोपी चंकेशला उत्तर प्रदेशातील गाजियाबादहून अटक केली आहे. चंकेश हा सध्या पोलीस कोठडीत आहे. आतापर्यंत त्याने एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. चंकेशने आणखीन किती लोकांना फसविले? याचा तपास टिळकनगर पोलीस करीत आहेत.
हेही वाचा :
भाजप आमदाराच्या मुलाला गंडवणारा आरोपी अखेर जेरबंद, वाचा नेमकं प्रकरण काय?