रात्रीस खेळ चाले, एकाच रात्री दोन ATM फोडले, नागरिकांना चोराची चाहूल, पोलिसांनी शिताफीने मुसक्या आवळल्या, भयानक थरार
कल्याण डोंबिवलीत चोरांचा प्रचंड सुळसुळाट बघायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून चोरांनी घरं-दुकानांना लक्ष्य केले आहे. 'हेही असे की थोडके' त्यांचं धाडस आता थेट एटीएम मशीन फोडून पैसे लंपास करण्यापर्यंत पोहोचलं आहे.
डोंबिवली (ठाणे) : कल्याण डोंबिवलीत चोरांचा प्रचंड सुळसुळाट बघायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून चोरांनी घरं-दुकानांना लक्ष्य केले आहे. ‘हेही असे की थोडके’ त्यांचं धाडस आता थेट एटीएम मशीन फोडून पैसे लंपास करण्यापर्यंत पोहोचलं आहे. डोंबिवलीत तर मंगळवारी (7 सप्टेंबर) मध्यरात्री एका चोरट्याने तब्बल दोन एटीएम मशीन फोडून पैसे पळवण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने त्याचा तो प्रयत्न हाणून पडला. काही सतर्क नागरिकांना चोराची चाहूल लागताच त्यांनी पोलिसांना त्याच्या दुष्कृत्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि चोर यांच्यात चांगलाच पकडा-पकडीचा खेळ रंगला. अखेर पोलिसांना या चोराच्या मुसक्या आवळण्यात यश आलं. डोंबिवलीच्या टिळकनगर परिसरात रात्रभर हा सगळा थरार सुरु होता.
नेमकं काय घडलं?
डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्रीच्या वेळेस चोरट्याने एक एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. पण त्याला एटीएम मशीन फोडण्यात अपयश आले. त्यानंतर या चोरट्याने रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील टिळक चौकातील आयआयसीआय बँकेच्या एटीएमला लक्ष्य केले. पण इथेही त्याने भरपूर प्रयत्न करुन देखील तो एटीएम फोडू शकला नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला.
काही सतर्क नागरिकांना चोराची चाहूल
आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन फोडत असताना परिसरातील काही सतर्क नागरिकांना संशय आला. त्यांनी आधी शाहनिशा करुन घेतली. त्यानंतर तातडीने रामनगर पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली. पोलिसांनी वेळेचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. चोरटा तेव्हा तिथेच होता. पण पोलीस गाडी आल्याची त्याला खबर झाली. तो एटीएममधून बाहेर पडला आणि पळू लागला. तो या गल्लीपासून त्या गल्लीत, त्या गल्लीपासून या गल्लीत पळत होता. त्याच्या पाठीमागे पोलीसही पळत होते. अगदी चित्रपटात दाखवतात तसंच काहीसं घडत होतं.
अखेर चोरटा रामनगर पोलिसांच्या हाती
खरंतर चोरटा हा कल्याण डोंबिवलीतला नव्हता. त्यामुळे त्याला रस्त्यांची माहिती नव्हती. याचाच फायदा पोलिसांना झाला. अखेर आरोपी फिरुन पोलिसांच्याच हाती लागला. या दरम्यान पोलिसांची देखील मोठी दमछाक झाली. पण चोर हाती लागला त्याचं समधान त्यांना होतं. पोलिसांनी आरोपी चोराच्या मुसक्या आवळत त्याला पोलीस ठाण्यात नेलं. त्याची चौकशी केली असता त्याचं नाव असगर शेख असं असल्याची माहिती समोर आली. असगर हा मूळचा झारखंडचा आहे. सध्या तो मुंबईतील डोंगरी परिसरात राहतो. या असगरवर किती गुन्हे दाखल आहेत याचा तपास पोलीस करीत आहेत.
हेही वाचा :
टॉयलेटचं पाणी गळण्यावरुन वाद, पालकांनी ‘पढवल्याने’ चिमुरडीचा शेजाऱ्यावर बलात्काराचा आरोप