मुंबई / गोविंद ठाकूर (प्रतिनिधी) : कस्टम अधिकारी असल्याचे भासवून हिरे व्यापाऱ्याकडे 80 लाखांची खंडणी (Ransom) मागणाऱ्या आरोपींना मुंबई क्राइम ब्रँच युनिट 12 ने बेड्या ठोकल्या आहेत. दोन बोगस कस्टम अधिकाऱ्यां (Bogus Custom Officer)सह हिरे व्यापाऱ्याकडे काम करणारा एक कामगार अशा एकूण तीन आरोपींना पोलीस पथकाने अटक (Arrest) केली आहे. विजय हिम्मतभाई हिरपारा, रवी अरविनभाई घोघरी आणि किसन पुरुषोत्तमभाई शिरोया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघेही आरोपी गुजरातमधील सुरतचे रहिवासी आहेत.
गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील एका हिरे व्यापाऱ्याने त्याच्याकडे काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या हातून 3 कोटी 5 लाख 19 हजार रुपयांचे हिरे दुबईला पाठवले होते.
पण हिरे व्यापाऱ्याच्या माणसाने दुबईला न जाता त्याच्या मालकाला फोन करून कळवले की, त्याला कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले आहे आणि त्याला सोडण्यासाठी 80 लाखांची मागणी करत आहे.
एवढेच नव्हे तर अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी दोन आरोपींनी स्वत:ला कस्टम विभागाचे अधिकारी सांगत हिरे व्यापाऱ्याशी फोनवर बोलून पैसे देण्यासाठी दहिसर येथील हॉटेलमध्ये बोलावले.
त्यानंतर क्राइम ब्रँच युनिट 12 च्या टीमला हिरे व्यापाऱ्याने या संपूर्ण घटनेची माहिती दिली आणि गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकून तीन आरोपींना रंगेहाथ अटक केली.