बदलापूरमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर सोमवारी करण्यात आले. त्यानंतर राज्यात सत्ताधारी अन् विरोधक समोरासमोर आले आहे. पोलीस अक्षय शिंदे याला तळोजा कारागृहातून घेऊन जात असताना नेमके काय घडले? यासंदर्भात अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करणाऱ्या संजय शिंदे यांनीच माहिती दिली.
अक्षय शिंदे याचा खात्मा करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी सांगितले की, संध्याकाळी पाच वाजता आम्ही अक्षय याला घेऊन तळोजा गणेशा के-1 कार्यालयाकडे आम्ही घेऊन जात होतो. त्यावेळी आमच्या बरोबर सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस हवालदार अभिजित मोरे, हरीश तावडे होते. पोलीस व्हॅनमध्ये अक्षय शिंदे याच्यासोबत एपीआय निलेश मोरे, हवालदार अभिजीत मोरे आणि हरीश तावडे बसले होते. मी चालकाच्या शेजारी बसलो होतो. जेव्हा गाडी शील डाउघरजवळ पोहचली तेव्हा पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितले की अक्षय शिंदे जोरजोराने ओरडत आहे.
निलेश मोरे यांच्या फोन आल्यावर मी गाडी थांबवली आणि मागे जाऊन बसलो. माझ्या समोरच्या जागेवर निलेश मोरे, त्यांच्या शेजारी आरोपी अक्षय शिंदे त्यानंतर अभिजीत मोरे बसले होते. मी अक्षयला शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो शिवीगाळ करत होता. आमची गाडी मुंबईतील वाय जंक्शन पुलाजवळ संध्याकाळी 6.15 वाजता पोहचली. त्यावेळी अक्षय शिंदे याने निलेश मोरे यांच्या कंबरेवर असलेली पिस्तूल खेचत ओरडू लागला. मला जाऊ द्या… त्यावेळी निलेश मोरे यांची पिस्तूल लोड झाली. त्याची एक गोळी त्यांच्या पायाला लागली. त्यानंतर तो ओरडला, आता मी कोणाला जिवंत सोडणार नाही. मग त्याने हवालदार हरीश तावडे यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. परंतु सुदैव चांगले होते, त्या गोळ्या लागल्या नाही. त्याचे ते रुप पाहून तो आम्हाला जीवे मारणार? ही आमची खात्री झाली. त्यानंतर माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी एक गोळी अक्षयच्या दिशेने चालवली. त्यानंतर तो जखमी झाला अन् खाली पडला. त्याच्या हातातून पिस्तूल सुटली.
पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी आपल्या जबाबात म्हटले की, आम्ही अक्षय शिंदे याच्यावर नियंत्रण मिळवले आणि गाडी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे वळवली. त्या ठिकाणी अक्षय शिंदे आणि सपोनि निलेश मोरे यांना उपचारासाठी भर्ती केले. डॉक्टरांनी उपचार सुरु केले. परंतु अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा…
शिंदे सरकारचा योगी पॅटर्न, चुकीला माफी नाही…बदलापूरच्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षयचा गेम ओव्हर?