खाकीत खुन्नस! बदलीच्या रागातून महिला पोलिसाचा विनयभंग; सहाय्यक निरीक्षकाच्या हातात बेड्या
आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने महिला सहकाऱ्याचा पाठलाग तसेच तिला मारहाण केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर त्याने संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याला अश्लील मेसेजही पाठवले.
मुंबई : मुंबई पोलीस दलामध्ये बदलीच्या मुद्द्यावरून दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या प्रकाराने सर्वांनाच धक्का दिला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या बदलीचा राग महिला पोलीस (Lady Police) कर्मचाऱ्यावर काढला आणि बदलीचा बदला (Revenge) घेण्यासाठी त्याने चक्क महिला पोलिसांचा विनयभंग (Molestation) केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी त्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अटक झाली आहे.
पाठलाग, मारहाण व अश्लील मेसेज पाठवून छळ
आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने महिला सहकाऱ्याचा पाठलाग तसेच तिला मारहाण केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर त्याने संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याला अश्लील मेसेजही पाठवले. याप्रकरणी त्या पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याने रीतसर तक्रार दाखल केली.
पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकाला (एपीआय) अटक केली आहे. दीपक बाबूराव देशमुख असे आरोपी सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. त्याला मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली.
आरोपी देशमुखने महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी घुसून तिला मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे. कुरार पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याने बुधवारी या कारवाईची माहिती दिली.
बदलीमागे महिला पोलिसाचा हात असल्याचा संशय
आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक देशमुखची नुकतीच पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. ही बदली पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून केली असावी, असा संशय देशमुखला आला होता.
याच संशयातून पीडितेला धडा शिकवण्यासाठी देशमुखने तिचा छळ सुरु केला, असे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
घरात घुसून मारहाण केल्याची तक्रार
पीडित महिला पोलिस कर्मचाऱ्याने तिला आरोपीने घरात घुसून मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मंगळवारी रात्री उशिरा देशमुखला अटक करण्यात आली.
त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील पोलिसाने त्याच्या बदलीचा बदला घेण्यासाठी केलेल्या या कृत्याची पोलीस दलासह सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.