मुंबई : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांच्या कथित प्रेम प्रकरणातील महिलेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राहुल शेवाळे यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडियावर सदर महिलेने पोस्ट करण्यावर बंदी घालण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. शेवाळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अॅड. अखिलेश चौबे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. आपली बदनामी करुन आपले करिअर संपवण्यासाठी षडयंत्र केल्याचा आरोप शेवाळे यांनी आपल्या याचिकेत केला आहे. तसेच याचिकेत ट्विटर, इंडिया ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन यांना देखील प्रतिवादी करण्यात आलं आहे.
सदर महिलेकडून सोशल मीडियावर आपल्यावर सतत आरोप करण्यात येत आहे. यावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून, खालच्या कोर्टात प्रकरण देखील सुरू आहे. मात्र हे प्रकरण निकाली निघेपर्यंत सदर महिलेमार्फत माझ्या विरोधात केल्या जाणाऱ्या पोस्टवर बंदी करण्यात यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
– सदर महिलेनं पोस्ट केलेले माझ्याशी संबंधित ट्विटरवरील आक्षेपार्ह ट्विट डिलीट करावे.
– सर्व सोशल प्लॅटफॉर्मवर माझ्याशी संबंधित कोणताही मजकूर टाकण्यास प्रतिबंध करावा.
– ट्विटरवरील सदर महिलेचे अकाउंट बंद करण्यात यावे.
– या केसचा निकाल लागेपर्यंत वरील मागणीच्या अंमलबजावणीसाठी तात्काळ आदेश द्यावे.
खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात एका महिलेनं साकीनाका पोलिसात तक्रार दाखल केली होती, मात्र या तक्रारीबाबत साकीनाका पोलिसांकडून कारवाई होत नाही म्हणून संबंधित महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती.
पिडीत महिलेला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने ती मुंबईत येऊ शकत नाहीत म्हणून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिने आपली बाजू मांडली होती. एप्रिल 2022 पासून ही पिडीत महिला पोलिसांनी तिची तक्रार घ्यावी म्हणून सातत्याने विनंती करूनही पोलिसांनी तक्रार घेतली नाही.
राजकीय दबावामुळे कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने सदर तक्रारीबाबत साकीनाका पोलीस कारवाई करण्यास सक्षम नसल्याचे महिला आयोगाकडून नमूद करण्यात आले आहे. यासंबंधी वरिष्ठ स्तरावरून तपास करण्यात यावा.
मुंबई पोलीस आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेऊन याबाबतीत योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे पत्र महाराष्ट्र राज्य महिला आयोगाद्वारे पाठविण्यात आले आहे. तर दुसरीकडे सदर महिलेविरोधात राहुल शेवाळे आणि त्यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांनी देखील तक्रार दाखल केली आहे.