मुंबई : चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांना खार पोलिसांनी अखेर अटक (Arrest) केली आहे. शिवसेनेच्या तक्रारीनंतर राणा दाम्पत्यावर खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला ताब्यात घेत कडेकोट बंदोबस्तात पोलिसांच्या गाडीतून खार पोलिस ठाण्यात आणले. राणा दाम्पत्याविरोधात कलम ‘153 A’ सह विविध कलमं दाखल करण्यात आली आहेत. त्यामुळे राणा दाम्पत्याला आजची रात्र पोलिस ठाण्यातच काढावी लागणार असे सांगण्यात येत आहे. राणा दाम्पत्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या हनुमान चालीसा प्रकरणाचा शेवट राणा दाम्पत्याच्या अटकेपर्यंत आलाय. पुढे आणखी काय काय राजकीय घडामोडी घडतील हे इतक्यात सांगणे कठिण आहे. (Rana couple arrested in Mumbai for making provocative statements)
यानंतर पोलिसांकडून पुरावे गोळा केले जातील. राणा दाम्पत्याची वादग्रस्त वक्तव्यं आहेत जी दोन समाजाशी संबंधित होती किंवा प्रक्षोभक होती. यासंदर्भातले व्हिडिओ, पुरावे पोलिस गोळा करतील. त्यानुसार राणा दाम्पत्याचा जबाब नोंदवला जाईल. त्यानंतर उद्या कायदेशीर प्रक्रिया सुरु झाल्यानंतर न्यायालयात राणा दाम्पत्याला हजर केले जाईल. न्यायालयात हे पुरावे सादर केले जातील. सर्व कायदेशीर बाबी पोलिस आज रात्रीच पार पडतील. दिवसभर तणावाचं वातावरण होतं. जर रवी राणा आणि नवनीत राणा घराबाहेर आले असते तर शिवसैनिक आणि राणा दाम्पत्यामध्ये मोठा वाद झाला असता. त्यामुळे कायदेशीर पाऊल मुंबई पोलिसांनी टाकले आहे.
पोलिस आणि राणा दाम्पत्यामध्ये बराच वेळ वादावादी झाली. राणा दाम्पत्याने वॉरंटची मागणी केली. वारंट आणल्याशिवाय पोलिस ठाण्यात येणार नाही, अशी भूमिका राणा दाम्पत्याने घेतली होती. मात्र बराच वेळ हायव्होल्टेज ड्रामा झाल्यानंतर अखेर पोलिसांनी राणा दाम्पत्याला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. पोलिस ठाण्यात दाखल होताच रवी राणा आणि नवनीत राणा यांनी घोषणाबाजी केली. तसेच शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. खार पोलिस ठाण्याबाहेरही मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते. या ठिकाणी सुद्धा शिवसैनिकांकडून घोषणाबाजी सुरु होती.
धर्म, भाषा, वंश इत्यादी कारणांवरून लोकांमध्ये द्वेष पसरवण्याच्या हेतून चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांवर आयपीसीचे कलम 153 (ए) लागू केले जाते. कलम 153(अ) मध्ये तीन वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा लागू होऊ शकतात. धार्मिक स्थळी हा गुन्हा केल्यास 5 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंडही होऊ शकतो. मात्र जर एखादा व्यक्ती स्वतःच्या जातीबद्दल, समाजाबद्दल, धर्माबद्दल बोलत असेल आणि दुसऱ्या समाजाबद्दल बोलत नसेल तर अशा स्वरुपाची कलमं लावत येत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले, अशी माहिती अॅड. अनिकेत निकम यांनी टीव्ही 9 ला दिली. तसेच कलम 153 अ मध्ये 7 वर्षाच्या आत शिक्षा सुनावली जाते. अशा गुन्ह्यात प्रथम 141 अ ची नोटीस बजावणे क्रमप्राप्त असतं. त्यानंतर जबाब नोंदवला जातो. पण समोरची व्यक्ती प्रतिसाद देत नसेल तर अटकेची कारवाई होतेस असेही अॅड. निकम यांनी स्पष्ट केले. (Rana couple arrested in Mumbai for making provocative statements)
इतर बातम्या