मुंबई : ईडी तपास करत असलेल्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणात आरोपी माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेला मुंबई सत्र न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. वाझे याने सीआरपीसी कलम 88 अंतर्गत जामिन मिळविण्यासाठी अर्ज केला होता. सचिन वाझे याच्या अर्जावर मागील सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद पूर्ण करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने आपला निकाल राखीव ठेवला होता.
आज विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी सचिन वाझेला जामीन मंजूर केला. ईडी प्रकरणात जामिन मंजूर झाला तरी देखील सीबीआय आणि एनआयए अँटेलिया प्रकरणात वाझे यांना अद्याप जामिन मिळालेला नाही म्हणून सचिन वाझे यांना कारागृहातच मुक्काम करावा लागणार आहे.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाचे विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आज दिलेल्या आपल्या निकालात असे निरीक्षण नोंदवले की, सचिन वाझे यांना ईडी प्रकरणात अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. त्यांनी तपास यंत्रणेला आवश्यक सहकार्य केले आहे.
याच प्रकरणात आरोपी अनिल देशमुख यांना जामिन देण्यात आला आहे. त्यामुळे वाझे यांना जामीन मंजूर करण्यात येत असल्याचं न्यायालयाने म्हटले आहे.
राज्याचे गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी 100 कोटी वसूल केल्याचा आरोप करण्यात आला. हे पैसे बार आणि हॉटेल मालकांकडून घेण्यात आले. यावेळी सचिन वाझे यानेही या कामात सक्रिय भूमिका बजावली होती.