नवनीत राणांना ‘या’ प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा, न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश
सत्र न्यायालयाने मुलुंड पोलिसांना तूर्त नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई / ब्रिजभान जैस्वार (प्रतिनिधी) : अमरावतीतील खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज मुंबईतील सत्र न्यायालयात तात्पुरता दिलासा (Relief) दिला. शिवडीच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाने चार दिवसांपूर्वीच त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट (Non-bailable Arrest Warrant) जारी केले होते. त्या वॉरंटला आव्हान देत नवनीत राणा यांच्या वकिलांनी सत्र न्यायालयात रिव्हीजन अर्ज केला. त्याची दखल न्यायालयाने घेतली आहे. नवनीत राणा व त्यांच्या वडिलांविरोधात दाखल करण्यात आलेल्या वॉरंटला 30 सप्टेंबरपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे.
बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात न्यायालयाने खासदार नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजन राम सिंग कुंडलेस यांना अंतरिम दिलासा दिला.
तूर्त अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश
सत्र न्यायालयाने मुलुंड पोलिसांना तूर्त नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष सत्र न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी हे निर्देश दिले.
नवनीत राणा यांनी राखीव कोट्यातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळेस त्यांनी सादर केलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
राणांवर अटकेची टांगती तलवार
या प्रकरणात न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्याविरोधात एका महिन्यात दोनदा वॉरंट बजावले. त्यामुळे नवनीत राणा व त्यांच्या वडिलांच्या अडचणीत वाढ झाली. दोघांवर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार आहे.
राणा यांनी अॅड. रिझवान मर्चंट यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अर्ज केला. त्यावर विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे सोमवारी सुनावणी झाली. यावेळी अॅड. मर्चंट यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या वॉरंटवर आक्षेप घेतला.
तपास अधिकारी सुनावणीदरम्यान अनुपस्थित
आजच्या सुनावणीदरम्यान तपास अधिकारी न्यायालयात हजर नव्हते. त्यामुळे सरकारी पक्षाने तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्यासाठी मुदत मागितली. यासंदर्भातील सरकारी पक्षाची विनंती मान्य करीत सत्र न्यायाधीश रोकडे यांनी नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंटला 30 सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे.
राणा यांनी आपण अनुसूचित जातीतील असल्याचा दावा करून लोकसभेची निवडणूक लढवली. त्यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये फेरफार करून मिळवल्याचे आढळून आले. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांचे वडिल हरभजन सिंग राम सिंग कुंडलेस यांच्याविरोधात मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.