कल्याणमध्ये सहा महिन्याच्या बाळाची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांनी आरोपींच्या नांग्या कशा ठेचल्या?
कल्याणमध्ये पुन्हा एकदा बाळ चोरीची घटना घडली. आरोपींची हिंमत एवढी की फूटपाथवर झोपलेल्या महिलेच्या शेजारी असलेल्या बाळाला घेऊन ते पसार झाले. संबंधित प्रकार समोर आला तेव्हा पीडित मातेने मुलासाठी हंबरडा फोडला. तिने पोलीस ठाण्यात जावून याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून अवघ्या 12 तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि बाळाची सुटका केली.
कल्याणमध्ये एका सहा महिन्याच्या मुलाची चोरीची घटना समोर आली आहे. या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दिनेश सरोज आणि अंकीत प्रजापती असे या दोन्ही आरोपींची नावे आहेत. या दोघांनी फुटपाथवरून सहा महिन्याच्या बाळाची चोरी का केली? याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दिनेश हा रिक्षा चालक आहे तर अंकित त्याच्या मेहुना आहे. विशेष म्हणजे कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात अशाप्रकारे बाळ चोरी होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील असा प्रकार समोर आला आहे. पण पोलिसांनी नेहमी बाळ शोधण्याची कर्तबगारी करुन दाखवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेत केडीएमसी बस स्टॉप शेजारी फुटपाथवर आयेशा समीर शेख नावाची महिला 6 महिन्याच्या बाळासोबत झोपली होती. या दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अयोशा यांच्या सहा महिन्याच्या मुलाचं अपहरण केलं. या प्रकरणी आयशा शेख यांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वपोनि शैलेश साळवी यांनी अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी 3 तपास पथके तयार केले होते.
पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या कशा आवळल्या?
तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे सापळा रचला. अखेर पोलिसांना आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आलं. पोलिसांनी दिनेश सरोज (वय 35), अंकीतकुमार प्रजापती (वय 25) या दोन्ही आरोपींना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. दोन्ही आरोपी उल्हासनगरला राहायचे. पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरातून 6 महिन्याच्या बाळाची सुखरुप सुटका केली.
पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या तेव्हा आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला. दोघांपैकी एका आरोपीने आपल्या घरी बाळाला नेलं होतं. पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या 12 तासात आरोपींना अटक केली. तसेच बाळाची सुखरुप सुटका केली. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली ऑटो रिक्षा, मोबाईल फोन सर्व गोष्टी पोलिसांनी ताब्यात घेतल्या.