ठाणे आहे की मिर्झापूर? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातून धक्कादायक घटना उघडकीस
ठाणे शहरात 24 तासांच्या आत दोनदा गोळीबार, गंभीर जखमी अवस्थेत असलेला तरुण मृत्यूशी झुंजला, पण...
गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे : ठाण्यात 24 तासांत दोन वेळा गोळीबार झाल्याचा घटना घडल्या. दरम्यान, या पैकी एका गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान या तरुणाने अखेरचा श्वास घेतला. मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव गणेश जाधव असं आहे. तर अन्य एक तरुण जखमी आहे. एकाच दिवशी दोन वेळा गोळीबार झाल्यानं ठाण्यात एकच खळबळ माजली होती. त्यामुळे हे ठाणे शहर आहे की मिर्झापूर, असा सवालही उपस्थित केला जातोय. दरम्यान, या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलंय. त्यांची कसून चौकशी केली जातेय.
ठाण्यातील नौपाडा आणि वर्तक नगर भागात गोळीबाराची घटना शुक्रवारी उघडकीस आली होती. या गोळीबार प्रकरणी ठाणे क्राईम ब्रांचने आणि नौपाडा पोलिसांनी 12 तासांच्या आतच आरोपींना अटक केलीय. ठाण्यातील क्राईम ब्रांचचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली.
पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास नौपाडा येथे तीन लोक आले. त्यांनी सुरवातीला गाडी फोडण्याचा प्रयत्न केला. त्या नंतर येथील लोकांनी विरोध केला. त्यामुळे मारहाण सुरू झाली. त्या नंतर त्यांनी घरातून पिस्तूल आणले आणि दहशत माजावण्याच्या उद्देशाने गोळीबार केला.
अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोरोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात अश्विन गंभरे याला गोळी लागली. त्याच्यावर कळवा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्या नंतर याच आरोपींनी वर्तक नगर हद्दीतील येऊर येथे गोळीबार केला.
जुन्या वादातून गोळीबाराची ही घटना घडली असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. या गोळीबारात उपचारादरम्यान, मृत्यू झालेला गणेश जाधव हा आरोपीचा मित्रच होता. वेदांत रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. गणेश जाधव याला डोक्यात आणि छातीत गोळी लागली होती.
आता गणेशच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा नोंदवला जाणार असून याप्रकरणी बिपीन मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. बिपीन यानेच गणेशवर गोळी झाडली होती. बिपीनसह त्याचा साथीदार सौरभ शिंदे आणि रिक्षा चालकालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.