बक्कळ पैसा कमावण्यासाठी अनोखी शक्कल, चारचाकी गाड्यांच्या सायलेन्सरची चोरी, सत्य समोर येताच पोलीसही चक्रावले
बक्कळ पैसा कमवण्यासाठी चक्क चारचाकी गाड्यांच्या सायलेन्सर चोरी करणाऱ्या एका टोळीला कळवा पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे : बक्कळ पैसा कमवण्यासाठी चक्क चारचाकी गाड्यांच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या एका टोळीला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता तपासाअंती पोलीसही चक्रावले झाले. हे चोरटे रात्रीच्या वेळेस विविध ठिकाणावरून चारचाकी गाड्यांचे सायलेन्सर काढून त्या सायलेन्सरमधील मातीतील प्लॅटिनम काढून घ्यायचे. तसेच चोरी केलेले सायलेन्सरमधून प्लॅटिनम काढून घेतल्यानंतर त्याची दुरुस्ती करत पुन्हा विकायचे.
कुर्ल्यातून चार आरोपींना अटक
कळवा पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वी आपल्या ईको गाडीचा सायलेन्सर चोरी झाल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. तपसादरम्यान पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही लागला. या सीसीटीव्हीमध्ये काही अज्ञात व्यक्ती चारचाकी गाडीतून पीडिताच्या गाडीजवळ येतात आणि ईको गाडीचा सायलेन्सर काढून फरार होतात. या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींच्या माग घेत चार आरोपींना मुंबईच्या कुर्ला येथून अटक केली. या चारही आरोपींकडून पोलिसांनी इको गाडीचे 25 सायलेन्सर जप्त केले.
आरोपींवर आधीपासून अनेक गुन्हे दाखल
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींवर ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, पुणे आणि गोवा अशा विविध जिल्ह्यातील गाड्यांचे सायलेन्सर चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत. या चोरी केलेला सायलेन्सर आणि त्यातील प्लॅटिनमची एकूण किंमत साडेसहा लाखांहून अधिक आहे. समसुद्दिन शहा, नदीम उर्फ नेपाळी कुरेशी, समसुद्दिन खान, सद्दाम खान अशी या चारही आरोपींची नावे आहेत. या आरोपींपैकी समसुद्दिन शहा याच्यावर याआधीही रायगड, मुंबईमधील विविध ठिकाणी 10 गुन्हे दाखल आहेत. या आरोपींनी अशाप्रकारे आणखीन काही गुन्हे केले आहेत? का याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांची प्रतिक्रिया
सध्या सोने आणि प्लॅटिनमचे भाव गगनाला भिडले आहेत. हेच लक्षात घेता चोरट्यांनी ही शक्कल लढवली. या संपूर्ण चोरीच्या प्रकरणात आरोपींनी इको गाडीच्या सायलेन्सरची निवड केली आहे. या गाडीची उंची, रिसेल व्हॅल्यू आणि सायलेन्सर काढण्यासाठी सोपे असल्याने त्यांनी या चारही गाड्यांची निवड केली असल्याचे पोलीस उपयुक्तांनी सांगितले (Thane Police arrest two accused who theft silencer of car).
हेही वाचा :
वाशी खाडी पुलावरुन आत्महत्येचा प्रयत्न, वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने तरुण बचावला
सॉफ्टवेअर बनवून देतो म्हणत 40 लाख घेतले, नंतर धूम ठोकली, भाजप आमदाराच्या मुलाची फसवणूक