राज्य सरकारला कोट्यवधींचा चुना लावणारा ULC घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सापडला, सूरतमधून बेड्या
कोट्यवधी रुपयांच्या यूएलसी घोटाळ्यातील मुख्य आरोपीला ठाणे पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे (Thane Police arrest ULC scam mastermind).
ठाणे : कोट्यवधी रुपयांच्या यूएलसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या मीरा भाईंदर कॉर्पोरेशनमध्ये नगर रचनाकार दिलीप घेवारे याला आज सकाळी गुजरातच्या सुरत येथे ठाणे गुन्हे शाखेने अटक केली. घेवारे दोन आठवड्यांपासून फरार होता. त्याने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्याच्या अटकपूर्व जामिनाची सुनावणी आज सत्र न्यायालयात ठेवण्यात आली. पण सुनावणी पूर्वीच ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने त्याला 28 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे (Thane Police arrest ULC scam mastermind).
नेमकं प्रकरण काय?
मीरा भाईंदर शहरात 2000 साली युएलसी अर्थात कमाल जमीन धारणा कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र, हा कायदा लागू नसल्याचे बोगस दाखले देऊन शासनाची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार नगररचनाकार दिलीप घेवारे याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज अखेर गुजरातमधून अटक केली आहे (Thane Police arrest ULC scam mastermind).
मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील अनेक जमीन यूएलसी कायद्याच्या कक्षेत येत असूनही त्या येत नसल्याचे बोगस दाखले ठाणे इथल्या यूएलसी विभागाने दिले होते. त्यामुळे शासनाला देय असणाऱ्या असंख्य सदनिका परस्पर विकल्या गेल्या. यात शासनाचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी 2012 साली ठाणे पोलिसात तक्रार दाखल झाली होती.
आरोपींना पोलिसांचा पाठींबा?
बोगस दाखले देणारे यूएलसी विभागाचे अप्पर जिल्हाधिकारी भास्कर वानखेडे यांचा पुढे मृत्यू झाला. मात्र याच विभागाचे सहायक नगर रचनाकार असणाऱ्या दिलीप घेवारे आणि सत्यवान धनेगावे यांच्याविरोधात कोणतीही कारवाई झाली नव्हती. तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या सहकार्याने ते मोकाट सुटल्याचा आरोप होत होता. या दरम्यान 4 विकासकांसह 5 जणांना अटकही झाली होती. ते सध्या जामिनावर आहेत.
घेवारे 25 दिवसांपासून फरार
परमबीर सिंग यांची बदली झाल्यानंतर आणि आता ते चर्चेत आल्यावर पुन्हा नव्याने कारवाई सुरू झाली. अखेर सत्यवान धनेगावे यांच्यासह आणखी दोन जणांना अटक झाली. ते सध्या तुरुंगात आहेत. पोलिसांच्या मते या प्रकरणी सूत्रधार असणारा घेवारे मात्र गेले 25 दिवस फरार होता. त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी सुरू होती. तिचा निकाल आज अपेक्षित होता. त्याआधीच पोलिसांनी घेवारे याला गुजरातमधील सुरतमधून आज सकाळी अटक केली.
हेही वाचा :
पर्सनल सेक्रेटरी आणि पीए ईडीच्या ताब्यात, चौकशींचे खलबतं सुरु, अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ