क्राईम शो पाहून कट रचला अन् डेंटिस्टला लुटले; घरातून ‘एवढा’ ऐवज लंपास
गोपे याने संरक्षक भिंतीवरुन उडी मारून डॉक्टरच्या घरात प्रवेश केला आणि घराच्या मागील बाजूने खिडकी उघडून घरात प्रवेश केला.
मुंबई : क्राईम शो (Crime Show) पाहून परफेक्ट प्लान करुन तिघा आरोपींनी वांद्रे परिसरात एका डॉक्टरला लुटल्या (Doctor Loot)ची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी तिघा आरोपींना अटक (Arrest) केली आहे. इंद्रजित सैनी, सुरेंद्र छेत्री आणि शामल गोपे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी सुरेंद्रला भारत-नेपाळ-तिबेट सीमेवर तर गोपेला दार्जिलिंगमधून अटक करण्यात आली आहे.
डेंटिस्टच्या घरी चोरी
या तिघांनी मिळून 12 सप्टेंबर रोजी वांद्रे येथील डेंटिस्ट डॉ. संदेश मयेकर यांच्या घरी घरफोडी केली होती. चोरी केल्यानंतर तिघांनी चोरीच्या मालाची आपापसात समान विभागणी केली आणि त्यानंतर दोघेजण मुंबईतून फरार झाले.
सुमारे 500 सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपी जाळ्यात
चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बंगल्यातील तसेच आसपासच्या परिसरातील सुमारे 500 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर पोलिसांना आधी शामलची माहिती मिळाली. त्याचा शोध घेत असतानाच तो दार्जिलिंगमध्ये असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने वांद्रे पोलिसांनी शामलला दार्जिलिंगमधून अटक केली.
पोलीस चौकशीत आरोपींची नावे उघड
शामलला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता सुरेंद्र छेत्रीचे नाव समोर आले. पोलिसांनी सुरेंद्रचा माग काढला. कोलकाता येथून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी तिबेट-नेपाळ सीमेवरील जलपाईगुडी रेल्वे स्थानकावर त्याच्या मुसक्या आवळल्या.
त्यानंतर पोलिसांनी शामल आणि सुरेंद्रची आणखी चौकशी केली असता इंद्रजितचा सहभाग असल्याचे उघड झाले. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी गोरेगाव पूर्वेतील संतोष नगर येथून इंद्रजितला बेड्या ठोकल्या.
तिघेही आरोपी केटरर म्हणून काम करायचे
तिघेही आरोपी गोरेगाव पूर्वेतील संतोष नगर परिसरातील झोपडपट्टीत भाड्याच्या खोलीत रहायचे. तिघे कॅटररचे काम करायचे. यापैकी इंद्रजीत हा वांद्रे परिसरात कॅटररचे काम करायचा. तिघांनाही क्राईम पेट्रोल मालिका पहाण्याची आवड होती.
ही मालिका पाहूनच त्यांनी चोरीचा डाव आखला. इंद्रजित हा वांद्रे परिसरात केटरर म्हणून काम करत असल्याने त्याला बंगल्यांची माहिती होती. 12 सप्टेंबर रोजी डॉ. मयेकर देव दर्शनासाठी बाहेर गेले असताना आरोपींनी संधी साधत ही घरफोडी केली, अशी माहिती वांद्रे पोलिसांनी दिली.
संरक्षक भिंतीवरुन उडी घेत बंगल्यात प्रवेश केला
गोपे याने संरक्षक भिंतीवरुन उडी मारून बंगल्यात प्रवेश करत मागील बाजूची खिडकी उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील 12 लाख रुपये किमतीचे सोने व मौल्यवान वस्तू चोरले आणि ते गोरेगाव येथील घरी पोहचले. तेथे त्यांनी चोरीचे सोने व मौल्यवान वस्तू वाटून घेतल्या.
पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी चोरीचा माल घेऊन गोपे आणि छेत्री एक्स्प्रेस ट्रेन पकडून वेगवेगळ्या ठिकाणी गेले.
मयेकर यांच्या आईने दरवाजा उघडा पाहिला असता घटना उघड
दुसऱ्या दिवशी सकाळी मयेकर यांच्या आईने घरातील खोलीचा दरवाजा उघडा पाहिला. त्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. यानंतर वांद्रे पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आरोपींचा शोध घेण्यासाठी झोन IX चे डीसीपी मंजुनाथ शिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सर्व आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.