आधी रिक्षा चोरली, मग शॉपिंग सेंटरमध्ये आले; पण अचानक पोलिसांची एन्ट्री झाली अन्…
दिंडोशीतील नागरी निवारा परिसरात आल्यानंतर हे सर्व लोक लुटण्याच्या बेतात असताना तेथे उपस्थित काही लोकांना संशय आला.
मुंबई / गोविंद ठाकूर (प्रतिनिधी) : मालाडमध्ये अलंकार शॉपिंग सेंटरवर दरोडा (Robbery) टाकण्यासाठी आलेल्या तीन आरोपींना दिंडोशी पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये पाठलाग करुन अटक (Arrest) केली आहे. हे दरोडेखोर अंधेरी येथून ऑटो रिक्षा चोरून (Auto Rikshaw Theft) शॉपिंग मॉलमध्ये दरोडा टाकण्यासाठी आले होते. मात्र दिंडोशी पोलिसांनी दरोड्याची माहिती मिळताच सापळा रचून 3 आरोपींना धारदार शस्त्रांसह पकडले. तर 3 आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाले.
अटक आरोपींकडून चोरीच्या रिक्षासह शस्त्र जप्त
अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चोरी, दरोडा, खंडणी, अंमली पदार्थ विक्री, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून धारदार शस्त्रे, 2 चोरीचे मोबाईल फोन आणि चोरीची ऑटो रिक्षाही जप्त करण्यात आली आहे.
अफजल अस्लम खान, आरिफ शफी अहमद अन्सारी आणि विघ्नेश व्यंकटेश देवेंद्र अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघेही बीएमसी कॉलनी, संतोष नगर गोरेगाव पूर्व मुंबई येथील रहिवासी आहेत.
अंधेरीतून रिक्षा चोरली होती आरोपींनी
दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरी निवारा परिसरात असलेल्या अलंकार शॉपिंग सेंटरवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने या तिन्ही दरोडेखोरांनी मध्यरात्री अंधेरी येथून ऑटो रिक्षा चोरली होती.
नागरिकांना संशय आल्याने पोलिसांना माहिती दिली
दिंडोशीतील नागरी निवारा परिसरात आल्यानंतर हे सर्व लोक लुटण्याच्या बेतात असताना तेथे उपस्थित काही लोकांना संशय आला. त्यांनी ही माहिती दिंडोशी पोलिसांना दिली.
दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय जीवन खरात यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी एपीआय डॉ.चंद्रकांत घार्गे यांच्यासह त्यांच्या पथकातील हवालदार नवनाथ बोराटे, श्याम रणशिवरे, शिवराम बांगर, अजित चव्हाण, राहुल पाटील, दत्तात्रय घार्गे यांनी तातडीने मॉलबाहेर सापळा रचला.
फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन आरोपींच्या मुसक्या आवळल्या
हे चोरटे मॉलमधील लुटलेला मुद्देमाल घेऊन पोलिसांनी त्यांना घेरले मात्र काहीजण तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी त्यांचा अंधेरीपर्यंत पाठलाग केला तेथून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस पुढील तपास करत आहेत.