लिव्ह-इन म्हणजे पाप असतं का? डोंबिवलीत एकीकडे नवऱ्याला दारु पाजत राहिले, दुसरीकडे बायकोला घेरलं आणि…
डोंबिवलीत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एक महिला लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आपल्या पतीसोबत राहत होती. या जोडप्यासोबत अतिशय वाईट आणि मन हेलावणारी घटना घडली आहे. संबंधित घटनेमुळे डोंबिवलीत खळबळ उडाली आहे.
डोंबिवली | 21 सप्टेंबर 2023 : राज्यात सर्रासपणे महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. कल्याण-डोंबिवली शहर तर गुन्हेगारीचा हॉटस्पॉट बनलं आहे. इथे सातत्याने महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपी नराधमांना पोलिसांचा धाक का राहिलेला नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय. पोलीस आतातरी महिला सुरक्षेसाठी काही ठोस पावलं उचलित, अशी आशा प्रत्येक घटनेनंतर निर्माण होते. पण पुन्हा तशाच घटनांची पुनरावृत्ती होताना दिसतेय. डोंबिवलीत यावेळी घडलेली घटना तर अतिशय संताजनक आणि घृणास्पद आहे.
डोंबिवलीतील विष्णू नगर परिसरात एक 19 वर्षीय महिला आपल्या पतीसोबत राहत होती. मात्र काही कारणांनी तिने डोंबिवली परिसरातील घर सोडून दुसरीकडे राहण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या घरातील सामान घराशेजारी राहणाऱ्या तिच्या पतीचे मित्र दिनेश गडारी आणि सुनील राठोड यांच्या घरात ठेवले. काही दिवसांनंतर 17 सप्टेंबरला आपलं सामान घेण्यासाठी ती पुन्हा डोंबिवलीत आली. यावेळी धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला.
महिलेवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार
पीडित महिलेच्या पतीच्या मित्रांनी आधी तिच्या पतीला दारु पाजली. त्यानंतर त्याला दारू घेण्यासाठी पुन्हा दुकानात पाठवले. यादरम्यान महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत दोघांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. थोड्या वेळाने तिचा पती घरी परतला तेव्हा पीडितने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पतीला सांगितला.
यानंतर पीडितेच्या पतीने या विषयी दोघांना विचारणा केली असता दोघांनी मिळून त्याला मारहाण सुरू केली. आपल्या पतीला मारहाण होताना पहात पत्नी घराबाहेर मदत मागण्यासाठी निघाली. मात्र आरोपींनी पुन्हा तिला धमकवत घराबाहेर उभ्या असलेल्या रिक्षामध्ये तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित महिलेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय.
विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. तसेच पोलिसांनी आरोपी दिनेशला बेड्या ठोकल्या आहेत. तर दुसरा आरोपी सुनीलचा शोध सुरू केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. यामुळे या दोघांनी मिळून तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस याही अनुषंगाने तपास करत आहेत.
लिव्ह इन म्हणजे पाप असतं का?
संबंधित दाम्पत्य हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतं. त्यामुळे आरोपींनी या गुन्ह्याचं धाडस केलं, असं वृत्त खरं असेल तर धक्कादायक आहे. लोकशाहीत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. लिव्ह इन रिलेशनशिपला सरकारने मान्यता दिलेली आहे.
प्रेम करणाऱ्या जोडप्याला लग्नाशिवाय एकत्र राहायचं असेल तर त्यात गैर काहीच नाही. पण याचा अर्थ तुम्ही लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या महिलेकडे वाकड्या नजरेने बघाल तर हा विचार अतिशय चुकीचा आहे. अशा विचारांना जागीच ठेचलं पाहिजे.