मुंबई / गोविंद ठाकूर (प्रतिनिधी) : राजस्थानच्या राजा महाराजांकडून कमी व्याजाने कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखा युनिट 11 च्या पथकाने अटक (Arrest) केली आहे. शाम तलरेजा आणि हितेश पर्सनानी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्वतःला महाराज म्हणवणारा एक आरोपी फरार (Absconding) आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
क्राईम ब्रँच युनिट 11 कडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे जास्त कर्ज घेणारे, व्यावसायिक कर्ज घेणाऱ्या लोकांना हेरायचे. मग या लोकांशी संपर्क साधायचे आणि राजस्थानच्या राजा महाराजांकडून कमी व्याजाने जास्त कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवायचे.
कर्जदार जाळ्यात फसल्यानंतर स्टॅम्प ड्युटी आणि पेपर वर्कच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून ते फरार व्हायचे. हे दोघेही एजंटच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या गरजू लोकांशी संपर्क साधायचे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाम तलरेजा नावाचा आरोपी मिटिंग घ्यायचा. तर दुसरा आरोपी हितेश पुरस्नानी कोणत्याही मोठ्या बँकेचा अधिकारी बनून साईड व्हिजिट करायचा.
या प्रकरणातील मुख्य आणि वाँटेड आरोपी राजस्थानचा राजा किंवा महाराजा असल्याचे भासवून महागड्या वाहनांमध्ये बाऊन्सर घेऊन मोठ्या हॉटेलमध्ये मिटिंग करायचा. मिटिंगमध्ये कर्जाची बोलणी व्हायची.
सध्या राजा फरार झाला असून गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत आहे. त्यांचे जाळे केवळ मुंबईतच नाही तर देशातील विविध राज्यात पसरले आहे. आतापर्यंत 10 ते 12 गुन्ह्यांची उकल करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे.
मुंबई क्राइम ब्रँच युनिट 11 पथकाने बँक अधिकारी आणि समन्वयक भासवणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. राजा महाराजाची भूमिका करणाऱ्या तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काही लोकांनी गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली होती. या फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.