मुलुंडमध्ये सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट, अवघ्या सहा मिनिटात दोघांना लुबाडलं, सीसीटीव्हीत घटना कैद
लॉकडाऊननंतर मुंबई उपनगरांमध्ये चैन स्नॅचर्सचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. मुलुंडमध्ये एकाच दिवशी दोन ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत (two chain snatching cases in Mulund Mumbai).
मुंबई : लॉकडाऊननंतर मुंबई उपनगरांमध्ये चैन स्नॅचर्सचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. मुलुंडमध्ये एकाच दिवशी दोन ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. संबंधित घटना ही बुधवारी (16 जून) सकाळच्या सुमारास घडली. एक वयोवृद्ध व्यक्ती सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकला निघाली होती. पण चोरट्यांनी स्कुटीवरुन येऊन त्या व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली. त्यानंतर ते गाडीवरुन पळून गेले. या घटनेनंतर त्यांनी अवघ्या काही मिनिटात आणखी एका व्यक्तीची चैन हिसकावली आणि ते पळून गेले. या घटनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे (two chain snatching cases in Mulund Mumbai).
चोरीच्या घटना सीसीटीव्हीत कैद
संबंधित घटना या मुलुंड पूर्व येथील नीलम नगर परिसरात घडली आहे. एक वयोवृद्ध व्यक्ती सकाळी मॉर्निंगवॉकसाठी निघाली होती. यावेळी चोरटे परिसरात स्कुटीवर फिरत होते. त्यांनी वयोवृद्ध व्यक्ती रस्त्यावर एकटं असल्याचा फायदा घेतला. दोन जणांपैकी एकजण स्कुटी चालवत होतं. तर मागच्या सीटवर बसलेला एक जण खाली उतरला. त्याने वयोवृद्ध व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली. त्यानंतर दोघे चोर स्कुटीवरुन पळून गेले (two chain snatching cases in Mulund Mumbai).
पहिली चोरी करुन दोघे चोरटे मुलुंड पूर्वेकडील कॅम्पस हॉटेल परिसरामध्ये आले. तिथेदेखील एका व्यक्तीच्या गळ्यातील चैन हिसकावून चोरटे पसार झाले. विशेष म्हणजे या दोन्ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये अवघ्या सहा मिनिटांचा फरक आहे. दोन ठिकाणी चोरी करुन चोरटे पूर्व द्रुतगती मार्गाच्या दिशेने पसार झाले.
याआधीदेखील सोनसाखळी चोरी
याआधी देखील 8 जून रोजी मुलुंडच्या गव्हाणपाडा परिसरात चैन स्नॅचरसने एका वरिष्ठ नागरिकाला लुटलं होतं. ती घटना ताजी असतानाच पुन्हा सहा मिनिटात दोन सोनसाखळी चोरीच्या घटना याच पूर्व परिसरामध्ये घडल्या. त्यामुळे आता या सोनसाखळी चोरांना गजाआड करण्याचं मोठं आव्हान नवघर पोलिसांसमोर आहे. याशिवाय या चोरट्यांना पोलिसांची भीती आहे की नाही? असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय.
हेही वाचा : मानलेल्या भाच्यासोबत संबंधाचा संशय, डोंबिवलीत काकाने अल्पवयीन पुतणीचा जीव घेतला