सुनील जाधव, Tv9 प्रतिनिधी, कल्याण | 4 फेब्रुवारी 2024 : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. गणपत गायकवाड हे गेल्या 15 वर्षांपासून कल्याण पूर्वचे आमदार आहेत. त्यांचे कल्याणमध्ये सर्वसामान्य नागरिकांसोबत फार घनिष्ठ संबंध आहेत. ते सर्वसामान्य नागरिकांशी अतिशय सौजन्याने वागत आले आहेत. त्यांनी अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित केले. ते प्रत्येक सामाजिक कार्यक्रमांमध्ये आघाडीवर असायचे. त्यांनी कल्याण पूर्वेत गुढीपाडव्याची शोभायात्रा काढण्यापासून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्यापर्यंतचं काम केलं. विशेष म्हणजे ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले तेव्हा सर्वसामान्यांना केबल मोफत करण्यात आलं होतं. पण गणपत गायकवाड सारख्या इतक्या संयमी लोकप्रतिनिधीने अशा टोकाचं पाऊल उचलणं धक्कादायक असल्याचं मत सर्वसामान्यांकडून व्यक्त केलं जात आहे. शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड हे तरुण तडफदार नेते आहेत. त्यांचंदेखील चांगलं समाजकार्य आहे. त्यांची तरुणांमध्ये क्रेझ आहे. पण असलं तरी या दोन तोलामोलाच्या नेत्यांमध्ये राजकीय शीतयुद्ध रंगलेलं असायचं. हे शीतयुद्ध अनेक वर्षांपासूनचं आहे. दोन्ही नेते एकाच गावातले, अगदी नात्यातले असल्याचं मानलं जातं. पण त्यांच्यातली दरी दिवसेंदिवस वाढत गेली आणि आता थेट पोलीस ठाण्यात गोळीबाराची घटना घडली.
गणपत गायकवाड यांनी गोळीबारानंतर आपला गुन्हा मान्य केला आहे. त्यांच्याकडून रागाच्याभरात हे कृत्य झाल्याचं स्पष्ट आहे. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत. पण कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी असो, किंवा सर्वसामान्य नागरीक कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही, असं भाजपचे ज्येष्ठ नेते देखील म्हणत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास केला जातोय. गणपत गायकवाड यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहेत. त्यानंतर आज त्यांच्यासह आणखी काही जणांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर गणपत गायकवाड यांना धक्का देणाऱ्या आणखी दोन बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे गणपत गायकवाड यांच्या अडचणी कदाचित वाढण्याची शक्यता आहे.
आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी कल्याण क्राईम ब्रँचने भाजप पदाधिकाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. निलेश बोबडे असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. निलेश बोबडे हे भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष आणि उल्हासनगर आयुष्यमान योजना अध्यक्ष पदावर काम करत असल्याची कार्यकर्त्यांची माहिती आहे. निलेश बोबडे हे गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या आरोपींच्या संपर्कात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली आहे. त्यामुळे क्राईम ब्रांचने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या चौकशीनंतर निलेश बोबडे यांचा काय रोल आहे हे येणार समोर आहे.
गणपत गायकवाड यांना धक्का देणारी दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपत गायकवाड यांना उल्हासनगर कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोर्टाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली होती. कार्यकर्त्यांना हीच घोषणाबाजी करणं महागात पडलं आहे. याप्रकरणी 11 जणांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.