कल्याण (ठाणे) : डोंबिवलीमधील सामूहिक बलात्कारातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेऊन रिपब्लिकन पक्षातर्फे 1 लाख रुपयांची सांत्वनपर मदत दिली. डोंबिवली मानपाडा पोलीस ठाणे येथे ही भेट झाली. यावेळी अत्याचार पीडित मुलीचे आई-वडिलांच्या हाती एक लाख रुपयांचा बेरर चेक देण्यात आला. त्यांचे डोंबिवलीत भाड्याने घर होते. त्या घरात आता पुन्हा आम्हाला जाता येत नाही. अत्याचार पीडित मुलीची लहान बहीण इयत्ता 4 थी मध्ये शिकत आहे. अत्याचार पीडित मुलीच्या सर्व कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे राज्य सरकारतर्फे पीडित मुलीच्या कुटुंबियांना म्हाडातर्फे घर देऊन सुरक्षितस्थळी पुनर्वसन केले पाहिजे, अशी मागणी रामदास आठवले यांनी यावेळी केली.
मुंबईत साकिनाका येथे अत्याचाराची घटना घडल्यानंतर त्यातील पीडितेच्या परिवाराला मुख्यमंत्र्यांनी 20 लाखांची मदत जाहीर केली आहे. त्या प्रमाणे डोंबिवलीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला राज्य सरकारने 20 लाखांची सांत्वनपर मदत देण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे, नायब तहसीलदार सुषमा बांगर, रिपाई जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव, डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड, दयाळ बहादूर, डी एम मामा चव्हाण, अण्णा रोकडे, घनश्याम चिरणकर, मीना साळवे, रामा कांबळे आणि भारत सोनवणे उपस्थित होते.
डोंबिवली सामूहिक अत्याचाराचा खटला जलद गती न्यायालयात चालवून 6 महिन्यात निकाल लावून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी यावेळी केली. डोंबिवली बलात्कार प्रकरणात पोलिसांनी 33 आरोपींना अटक केली. एव्हढ्या मोठ्या प्रमाणात आरोपी असण्याचा हा प्रकार देशात पाहिल्यांदाच घडला आहे. हे बलात्कार प्रकरण मानवतेला कलंक असून रिपाईंच्या वतीने या प्रकरणाचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध, असं रामदास आठवले म्हणाले. याप्रकरणी पोलिसांनी तपास काम करुन चांगली कामगिरी केल्याबद्दल रिपाईतर्फे पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले.
डोंबिवली येथे अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याचे समोर येताच राज्यात संतापाची लाट उसळली होती. भाजप तसेच इतर विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. 15 वर्षीय मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात आपल्यावर 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरु असल्याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर चौकशीमध्ये जी माहिती समोर आली ते ऐकून पोलीस हैराण झाले होते.
हेही वाचा :
लग्नाच्या आमिषाने विवाहित पोलीस उपनिरीक्षकाकडून बलात्कार, कोथरुड पोलिसात तक्रार
उल्हासनगरात वालधुनी नदीत अज्ञात मृतदेह, परिसरात खळबळ, हत्या की आत्महत्या, गूढ कसं उलगडणार?