साडी नेसून तृतीयपंथी असल्याचं नाटक, भोळ्या कुटुंबांना हेरत जादूटोण्याच्या नावाने दागिने पळवायचा, पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम
वसई पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. हा आरोपी साडी नेसून तृतीयपंथी असल्याचं नाटक करायचा. त्यातून तो साध्या-भोळ्या कुटुंबांना फसवायचा. त्याने आतापर्यंत अशा अनेक कुटुंबांना फसवलं.
पालघर (वसई) : वसई पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. हा आरोपी साडी नेसून तृतीयपंथी असल्याचं नाटक करायचा. त्यातून तो साध्या-भोळ्या कुटुंबांना फसवायचा. त्याने आतापर्यंत अशा अनेक कुटुंबांना फसवलं. पण अखेर त्याला जेरबंद करण्यात वसई पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे त्याचा मुलगादेखील अशाचप्रकारचे धंदे करत असल्याचं पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं आहे. पोलीस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
तुमच्या घरावर संकट येणार आहे, असे सांगून त्याचे निवारण करण्याच्या बहाण्याने नागरिकांना तृतीयपंथी बनून लुटणाऱ्या अट्टल भामट्याला पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे. जितूभाई जव्हेरभाई परमार असं 37 वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो वसईतच वास्तव्यस होता. गेल्यावर्षी पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गारोडिया नगरमध्ये रहात असलेल्या दाणाभाई पटेल यांच्या घरी हा जितूभाई तृतीयपंथी बनून आला होता. घराबाहेर काळी फुली मारुन त्याने तुमच्यावर घोर संकट आले आहे, असे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला सांगितले होते.
आरोपीने पटेल कुटुंबियांना पाण्याच्या ग्लासमध्ये थोडी मिर्ची आणि मीठ टाकून आणा, असे त्याने घरातील सदस्यांना सांगितले. त्यानंतर त्याने ते पिऊन टाकले आणि आपले संकट पिऊन टाकले, असे सांगितले. त्यानंतर घरातील कुटुंबियांच्या अंगावरील प्रत्येकी एक असा सोन्याचा दागिना एका रुमालामध्ये ठेवण्यास सांगून तो बाहेर चौकात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर त्याने सोन्याचे ऐवज परत घेऊन जाण्यास सांगितले. पण त्यावेळी त्याने कुटुंबियांना बोलण्यात गुंतवले. त्यानंतर त्याने हातचालखी करुन ते सोने घेऊन पळ काढला होता.
पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?
याबाबत पटेल कुटुंबाने पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. पंतनगर पोलीस या आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांना सदर आरोपी हा मुलुंडच्या नवघरमध्ये येणार असल्याची माहिती शुक्रवारी (22 ऑक्टोबर) मिळाली. पंतनगर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून या अट्टल ठगाला ताब्यात घेतलं. त्याच्यावर गुजरातमधील अंबाझरी पोलीस ठाणे, लिंबायत पोलीस ठाणे, गिर्याधर पोलीस ठाणे, जुनागड तालुका पोलीस ठाणे, जेतपूर सिटी पोलीस ठाणे, भायावधार पोलीस ठाणे इत्यादी पोलीस ठाण्यात असेच फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
आरोपीचा मुलगाही अशाचप्रकारे लोकांना फसवतो
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल वाघमारे आणि पथकाने या आरोपीला शिताफीने अटक केली आहे. हा आरोपी तृतीयपंथी बनून नागरिकांना गंडा घालत असला तरी त्याला एक मुलगा असून तो देखील अशाच प्रकारे गुजरात आणि महाराष्ट्रमध्ये फिरुन नागरिकांना जादूटोनाच्या नावाखाली गंडा घालत असल्याचे समोर आले आहे. सध्या पंतनगर पोलीस या आरोपीची कसून चौकशी करीत आहेत. त्याने मुंबईत आणखी किती लोकांना अशाप्रकारे फसविले आहे? आणि या फसवणुकीमधील मुद्देमाल कुठे आहे? याचा पोलीस शोध घेत आहे.
हेही वाचा :
उल्हासनगरात इस्टेट एजंट्सकडून वृद्धेच्या हत्येचा प्रयत्न, एक आरोपी अटकेत दुसरा फरार