K. M. Nanavati | माझ्या बायकोशी लग्न करशील का? प्रेम आहुजाच्या उत्तरानंतर तीन गोळ्या झाडल्या, काय आहे नानावटी केस?
के एम नानावटी आधी नौदल तळावर गेला. तिथे त्याने खोटे कारण सांगून स्टोअरमधून सहा गोळ्यांसह पिस्तूल घेतले. आपली अधिकृत कर्तव्यं पूर्ण केली आणि तो प्रेम आहुजाच्या कार्यालयात गेला. मात्र तिथे तो न सापडल्याने नानावटी आहुजाच्या फ्लॅटवर गेला, प्रेम तिथेच होता... वाचा पुढे काय घडलं
मुंबई : 1959 मध्ये एका अत्यंत हायप्रोफाईल मर्डर केसने भारतीयांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कमांडर के एम नानावटी विरुद्ध राज्य सरकार (Commander K. M. Nanavati vs. State of Maharashtra) या नावाने ही केस ओळखली जाते. नौदल अधिकारी कमांडर कवास मानेकशॉ नानावटी (Commander Kawas Manekshaw Nanavati) यांनी पत्नीचा प्रियकर प्रेम अहुजा (Prem Ahuja) याची हत्या केल्याचा हा खटला होता. कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या नानावटीची ज्युरींकडून आधी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मात्र बॉम्बे हायकोर्टाने हा निकाल धुडकावून लावत खंडपीठाची स्थापना केली. त्यानंतर नानावटीला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला होता.
नानावटी खटला नव्या पिढीसाठी अनोळखी नाही. कारण पाच वर्षांपूर्वी अभिनेता अक्षयकुमारची भूमिका असलेल्या रुस्तम चित्रपटातून (2016 film Rustom) हे कथानक मांडण्यात आलं होतं. त्या आधी 1963 मधील ये रास्ते है प्यार के, 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या अचानक चित्रपटांतही हा खटला दाखवण्यात आला होता.
काय आहे प्रकरण?
कावास मानेकशॉ नानावटी (1925-2003) हा एक पारशी व्यक्ती होता. भारतीय नौदलात तो कमांडर पदावर होता. सिल्व्हिया (Sylvia) ही त्याची इंग्रजी वंशाची पत्नी. दोन मुले आणि एक मुलगी यांच्यासह ते मुंबईत स्थायिक झाले होते. नानावटी सहसा बऱ्याच काळासाठी कामानिमित्त दूर असल्याने, सिल्विया दरम्यानच्या काळात नानावटीचा सिंधी मित्र प्रेम भगवान अहुजाच्या प्रेमात पडली.
सिल्व्हियाची पत्रं
प्रेमची बहीण मामी आहुजा हिने न्यायालयात दिलेल्या साक्षीत सांगितले, की जर सिल्व्हियाने तिच्या पतीला (नानावटी) घटस्फोट दिला, तर तिच्याशी लग्न करण्यास प्रेमने सहमती दर्शवली होती. मात्र सिल्व्हियाने (सिल्व्हियाची साक्ष म्हणून स्वीकारलेले) लिहिलेल्या पत्रांमध्ये यात विरोधाभास जाणवतो, त्यात तिने नानावटीला घटस्फोट देण्याची आणि प्रेमशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु प्रेमच्या मनात तोच हेतू आहे की नाही, याबद्दल तिला शंका होती.
तिने पत्रात लिहिले होते “काल रात्री जेव्हा तू माझ्याशी लग्न करण्याबद्दल किंवा ज्या इतर मुलींशी लग्न करण्याच्या शक्यतेबद्दल तू बोललास, तेव्हा माझ्या आत काहीतरी गलबलले. मला माहित होते, की तू दुसऱ्या कोणावर प्रेम करण्याचा विचार मी सहन करू शकत नाही”
सिल्व्हियाची पतीकडे अफेअरबद्दल कबुली
27 एप्रिल 1959 रोजी नानावटी दौऱ्यावरुन घरी परतला, तेव्हा सिल्व्हिया अलिप्त आणि नाराज दिसल्याने त्याने तिची विचारपूस केली. प्रेम आपल्याशी लग्न करण्याच्या हेतूवर संशय असल्याने सिल्व्हियाने तिच्या पतीकडे आपल्या अफेअरबद्दल कबुली दिली. त्यानंतर नानावटीने काहीसा विचार करुन आपल्या कुटुंबाला मेट्रो चित्रपटगृहात टॉम थंब चित्रपट पाहण्यासाठी सोडले. तिथून तो थेट प्रेम आहुजाला जाब विचारण्यासाठी गेला.
जेव्हा सिल्व्हियाला कोर्टात विचारण्यात आले की ती आपल्या अस्वस्थ पतीला सोडून सिनेमाला का गेली, तेव्हा तिने उत्तर दिले, “मी स्वतः अस्वस्थ होते आणि मी तेव्हा स्पष्टपणे विचार केला नाही. माझा पतीला स्वतःच्या जीवाचं बरंवाईट करेल, असा विचार माझ्या मनात नव्हता. या गोष्टी मुलांना समजावून सांगणं कठीण होतं. म्हणून मी त्यांना घेऊन सिनेमाला नेले.
प्रेमच्या घरी जाऊन हत्या
नानावटी आधी नौदल तळावर गेला. तिथे त्याने खोटे कारण सांगून स्टोअरमधून सहा गोळ्यांसह पिस्तूल घेतले. आपली अधिकृत कर्तव्यं पूर्ण केली आणि प्रेम आहुजाच्या कार्यालयात गेला. तिथे तो न सापडल्याने नानावटी आहुजाच्या फ्लॅटवर गेला. प्रेम तिथेच होता. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. कोर्टात नानावटीने दिलेल्या जबाबानुसार, त्याने आहुजाला विचारले होते की, सिल्व्हियाशी लग्न करुन त्यांची मुले स्वीकारण्याची त्याची इच्छा आहे का? प्रेमने नकारार्थी उत्तर दिल्याने आपण तीन गोळ्या झाडल्या आणि प्रेम आहुजा मृत्युमुखी पडला. नानावटी थेट पश्चिम नौदल कमांडच्या प्रोवोस्ट मार्शलकडे कबूल करण्यासाठी गेला. त्यांच्या सल्ल्यानुसार त्याने स्वत: ला पोलीस उपायुक्तांच्या स्वाधीन केले.
कोर्टात कोणता मुद्दा होता
या प्रकरणाचा मुख्य मुद्दा असा होता की नानावटीने “रागाच्या भरात” (“heat of the moment”) आहुजाला गोळ्या घातल्या की तो पूर्वनियोजित खून होता. पहिल्या परिस्थितीत, नानावटीला भारतीय दंड संहितेअंतर्गत हत्याकांडात दोषी आढळल्यास जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा दिली गेली असती. याचे कारण असे की तो आयपीसीच्या कलम 300 चे 1 आणि 4 अपवाद लागू करू शकला असता.
अपवाद 1 – अपराधी, गंभीर आणि अचानक चिथावणी मिळाल्याने स्वनियंत्रण गमावून, चिथावणी देणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरला किंवा चुकून किंवा अपघाताने इतर कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यास सदोष मनुष्यवध ही हत्या नाही.
अपवाद 4 – आकस्मिक भांडण झाल्यावर उत्कटतेच्या भरात अचानक लढा देऊन आणि गुन्हेगाराने अयोग्य फायदा घेतल्याशिवाय किंवा क्रूर किंवा असामान्य पद्धतीने वागला नाही तर सदोष मनुष्यवध ही हत्या नाही.
नानावटीला या प्रकरणात जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला. मानसन्मानाचे रक्षण करणारा मध्यमवर्गीय पती अशी त्याची प्रतिमा तत्कालीन मीडियाने जनमानसात रेखाटली. तीन वर्षांचा तुरुंगवास भोगला. त्यानंतर पत्नी आणि तिन्ही मुलांसह तो कॅनडातील ओंटारियोला स्थायिक झाला. 24 जुलै 2003 रोजी त्याचे निधन झाले.
संबंधित बातम्या :
अभिनेत्री प्रिया राजवंशची गळा दाबून झालेली हत्या, लिव्ह इन पार्टनर चेतन आनंदच्या मुलांवरच होता आरोप