तीन गाड्यांना ठोकर मारली, कोणी जखमी झाले नाही, तरी कोर्टाने तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली
त्याने वेगवेगळ्या तीन गाड्यांना टक्कर मारली. यातून स्पष्ट होत आहे की तो बेदकारपणे वाहन चालवित होता. पहिली ठोकर मारल्यानंतर तो थांबला. त्यानंतर पुन्हा गाडी चालवून त्याने अन्य दोन वाहनांना ठोकरले.
मुंबई : त्याने बेदरकारपण वाहन चालवून तीन वाहनांना ठोकरल्याने त्याला कोर्टाने त्याला तीन महिन्यांची सक्तमजूरीची ( Imprisonment ) सजा सुनावली. आरोपीने तीन वाहनांना जोरदार धडक दिल्याने वाहनांचे नुकसान झाले असले तरी कोणीही जखमी झालेले नाही. तरीही कोर्टाने या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. याचे कारण आरोपी वाहन चालवताना नशेत ( Drunk Driving ) होता हे वैद्यकीय तपासणीत ( Medical Test ) स्पष्ट झाले. दारुच्या नशेमुळे आरोपी चालक योग्य निर्णय घेऊ शकत नाही. स्वत:च्या प्राणासह तो दुसऱ्याच्या प्राणासही धोक्यात टाकत असल्याने तो शिक्षेस पात्र असल्याचे कोर्टाने निकाल देताना म्हटले आहे.
साल 2017 मध्ये पेडर रोडवर वाहन वेगाने चालवून तीन वाहनांना ठोकर मारल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला दोषी ठरविण्यात आले आहे. त्याला कोर्टाने तीन महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. परंतू न्याय दंडाधिकाऱ्याने आरोपी प्रशांत कुमार ठाकूर याच्या शरीरात 88 मिलीग्राम अल्कोहल सापडल्याने हा निकाल दिला आहे. मोटर वाहन अधिनियमाच्या कलम 185 अनुसार जर चालकाच्या मेडीकल तपासणीत 30 मिलीग्राम पेक्षा अधिक अल्कोहल सापडले तर त्याला दारुच्या अंमलाखाली वाहन चालविल्याच्या प्रकरणात दोषी मानले जाते.
दारुच्या नशेत तीन वाहनांना टक्कर
कोर्टाने सुनावणी दरम्यान म्हटले की आरोपी दारुच्या नशेत वाहन चालवित होता. त्याने वेगवेगळ्या तीन गाड्यांना टक्कर मारली. यातून स्पष्ट होत आहे की तो बेदकारपणे वाहन चालवित होता. पहिली ठोकर मारल्यानंतर तो थांबला. त्यानंतर पुन्हा गाडी चालवून त्याने अन्य दोन वाहनांना ठोकर मारली. महानगर दंडाधिकारी नदीम ए.पटेल यांनी पुढे म्हटले की यावरुन स्पष्ट होते की आरोपी दारुच्या अंमलाखाली असल्याने त्याने आपले वाहन वेगाने आणि बेदरकारपणे चालविले होते.