junagadh hate speech case : मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना आता अटक करण्यात आली आहे. काल त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. गुजरातच दहशतवाद विरोधी पथक ATS त्यांना घेऊन गुजरातला रवाना झालय. गुजरातच्या जुनागढमध्ये प्रक्षोभक भाषण दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याच समजल्यानंतर घाटकोपर पोलीस स्टेशनबाहेर हजारोंचा जमाव जमला होता. घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर जमलेली गर्दी घोषणाबाजी करत होती. परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे परिसरात पोलिसांना प्रचंड मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला.
मुफ्ती सलमान अजहरी यांचे समर्थक घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर रास्ता रोको करून घोषणाबाजी करत होते. त्यांच्या समर्थकांनी अफाट गर्दी केली होती. त्यामुळे पोलीस प्रशासनावर दबाव वाढला होता. गुजरात एटीएसने जेव्हा मुफ्ती मौलानाला घाटकोपर पोलिस ठाण्यात आणलं, तेव्हा घाटकोपर पोलिस ठाण्याबाहेर शेकडो लोक जमा झाले होते. परिस्थिती अशी आली की, मुफ्ती सलमान अजहरीने माइकवरुन पोलीस स्टेशनबाहेर जमलेल्या गर्दीला संबोधित केलं. “मी गुन्हेगार नाहीय. मला कुठल्या गुन्ह्यासाठी इथे आणलेलं नाहीय. ते आवश्यक चौकशी करतायत आणि मी त्यांना सहकार्य करतोय. माझ्या नशिबात लिहील असेल, मला अटक झाली, तर त्यासाठी सुद्धा मी तयार आहे” असं ते म्हणाले.
मुंबई पोलिसांनी काय कारवाई केली?
दरम्यान मुंबई पोलिसांनी आता पोलीस स्टेशनबाहेर गोंधळ घालणाऱ्या जमावाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. मुंबई पोलिसांनी आयपीसीच्या कलम 353, 332, 333, 341, 336, 337, 338, 141, 143, 145, 147, 149 आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या संबंधित कलमांनुसार या जमावाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.