घरफोडीची नवी पद्धत होती…चोर पकडण्यास अडथळा येत होता, पण शेवटी पोलीसांनी शक्कल लढवत मसुक्या आवळल्याच…
नाशिकमधील मुंबई नाका पोलिसांनी कारवाई करत 4 घरफोड्या करणाऱ्या एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 6 लाख 55 हजार रुपये किंमतीचे एकूण 13 तोळे सोने हस्तगत केलेय.
चैतन्य गायकवाड, नाशिक : चोर कितीही हुशार असला तरी एक दिवस तो पोलिसांच्या ताब्यात सापडतोच. असाच एक चोर पोलिसांना आपल्या राहणीमानाच्या जोरावर हुलकावणी देत होता. सुटाबुटात राहणारा हा चोर बंद घर हेरून कटावणीच्या सहाय्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरी करत होता. चोरी करून जातांना मात्र विशेष खबरदारी बाळगत होता. घराचा दरवाजा आणि तोडलेले कुलूपही बरोबर घेऊन जात होता. त्यामुळे चोरीचे पुरावेच नष्ट करून चोरटा पळून जात होता. आणि हीच बाब नसल्याने पोलीसांच्या तपासात अडथळा ठरत होती. आणि गुन्ह्याची उकल होत नव्हती. परंतु पोलीसांनी ठरवलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही हे अनेकदा समोर आले आहे. घरफोडीची उकल करण्यासाठी पोलीसांनी गेट ॲनालिसिस प्रणालीचा वापर केला, सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्यक्तीची चौकशी करून त्याला ताब्यात घेतले. आणि तब्बल चार घरफोडयांची उकल झाली आहे.
नाशिकमधील मुंबई नाका पोलिसांनी कारवाई करत 4 घरफोड्या करणाऱ्या एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
त्याच्याकडून 6 लाख 55 हजार रुपये किंमतीचे एकूण 13 तोळे सोने हस्तगत केलेय. वडाळा नाका येथे राहणाऱ्या रिजवान मलंग शहा या संशयित आरोपीला अटक केली आहे.
विशेष म्हणजे या संशयिताचे पूर्वी कुठलेही गुन्हेगारीचे रेकॉर्ड पोलिसांत नसल्याने गुन्हे करण्यात हा अट्टल चोर असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
नाशिकमध्ये विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या घडल्या आहेत, त्या अनुषंगाने देखील शहा याची चौकशी केली जात आहे. त्यामुळे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अलिकडच्या काळात चोरटे अद्यावयत यंत्रणा वापरुन चोऱ्या करत असतांना त्या गुन्ह्यांची उकल करतांना पोलिसांना अडचण येत असते, तसाच काहीसा गुन्हा नाशिक पोलीसांनी उघडकीस आणल्याने सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.