डोंगरी परिसरात एनसीबीची मोठी कारवाई, ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज जप्त
एनसीबीने ड्रग्ज माफियांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. या कारवाईचा भाग म्हणून एनसीबीने डोंगरी परिसरात छापा टाकत मोठी कारवाई केली आहे.
मुंबई : मुंबई एनसीबीने डोंगरी परिसरात मोठी कारवाई करत 50 कोटींचे ड्रग्स पकडले आहे. एनसीबीचे मागच्या काही दिवसात केलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. डोंगरी परिसरात ड्रग्स संदर्भातल्या अनेक मोठ्या कारवाया मुंबई पोलीस आणि एनसीबीकडून केल्या जातात. मात्र एनसीबीने काल केलेली ही कारवाई पाहता या कारवाईनंतर काही कनेक्शन्स उघड होण्याची शक्यता आहे. एनसीबीने केलेल्या कारवाईत 45 ते 50 कोटी किमतीचे 20 किलो एमडी ड्रग्स, 1 कोटी 10 लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी एनसीबीने एकूण तीन आरोपींना अटक केली असून, आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
अमित घावटे यांच्या नेतृत्वातील मोठी कारवाई
आरोपी महिला या प्रकरणात मास्टरमाईड असल्याचं बोललं जातंय. ए ए शेख अस महिला आरोपीचे नाव आहे. एनसीबीचे विभागीय संचालक अमित घवाटे यांच्या नेतृत्वात डोंगरीतली ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. याआधी एकदा एनसीबीने अशीच एक मोठी कारवाई डोंगरी परिसरात केली होती. ज्यात दाऊद टोळीशी संबंधित लोकांना अटक झाली होती.
एनसीबीचे विभागीय संचालक अमित घवाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे एक मोठे सिंडिकेट असून यातील कनेक्शन तपासले जात आहेत. आरोपींवर याआधीही असे गुन्हे दाखल असण्याची शक्यता असून, एनसीबीकडून त्याची पडताळणी केली जात आहे. या केसमध्ये अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे का हे आताच सांगू शतक नाही, मात्र तपास सुरू आहे. MMR रिजनमध्ये हा सगळा ड्रग्सचा पुरवठा केला जात होता.