लेडी ड्रग माफीया अखेर एनसीबीच्या जाळ्यात, तस्करांचे धाबे दणाणले, काळ्या दुनियेच्या पडद्यामागची कहाणी समोर येणार?
एनसीबीने ड्रग माफियांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. एनसीबीकडून ठिकठिकाणी छापेमारी करत आरोपींची धरपकड सुरु आहे. अशीच कारवाई करत एनसबीने लेडी माफियाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मुंबई : मुंबई शहर ड्रग माफियांचं हब बनत चाललं आहे. त्या अनुषंगाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची ड्रग माफिया विरोधात सतत कारवाई सुरू असते. अशाच एका प्रकरणांमध्ये मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठी कारवाई करत एका महिला ड्रग माफियाला अटक केली आहे. या महिलेकडून 130 ग्राम एमडी ड्रग देखील जप्त करण्यात आलं आहे. एसबी अन्सारी असे अटक महिलेचे नाव असून तिला कळवा येथून अटक केली आहे. महिला विरोधात याआधी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. या संदर्भात अधिक तपास सुरू आहे. ही महिला कुठल्या गँगशी संबंधित आहे? यामागे कोण आहे? याचा शोध सुरु आहे.
महिलेचा दोन ड्रग रॅकेट प्रकरणात सहभाग
एनसीबी सूत्रांच्या माहितीनुसार, ही महिला दोन मोठ्या ड्रग रॅकेट प्रकरणांमध्ये संशयित आहे. या प्रकरणांचा तपास एनसीबीकडून सध्या सुरु आहे. मुंब्रा, ठाणे, मुंबई आणि जवळपासच्या परिसरामध्ये ड्रग विक्रीचा धंदा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती एनसीबी अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती. एक महिला ड्रग विक्री करीत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. एनसीबी टीमने सापळा रचून महिला आरोपीला मुंब्रावरून अटक केली. एनसीबी मुंबई झोनल डायरेक्टर अमित घावटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीतर्फे सतत ड्रग विक्री आणि ड्रग माफियांच्या विरोधात कारवाई सुरु असते. त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.