Mumbai Crime : अशी आई असण्यापेक्षा… कडाक्याच्या थंडीत नवजात बाळाला हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये टाकून पळालेल्या ‘तिला’ अटक
सायनमधील एका रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये नवजात बालिकेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. जन्मत:च त्या मुलीला रुग्णालयातील टॉयलेटमधील कचऱ्यात फेकून दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पोटच्या लेकीला असे बेवारसासारखं टाकून देणाऱ्या त्या पाषाणहृदयी मातेला पोलिसांनी अटक केली आहे.
कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 12 डिसेंबर 2023 : गेल्या आठवड्यात सायनमधील एका रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये नवजात बालिकेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. जन्मत:च त्या मुलीला रुग्णालयातील टॉयलेटमधील कचऱ्यात फेकून दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. अखेर याप्रकरणी मोठा , धक्कादायक खुलासा झाला असून पोटच्या लेकीला असे बेवारसासारखं टाकून देणाऱ्या त्या पाषाणहृदयी मातेला पोलिसांनी अटक केली आहे. रिझवाना (वय 23) असे त्या महिलेचे नाव असून ती धारावीत रहात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे.
सफाई कर्मचारी महिलेला सापडली नवजात बालिका
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 8 डिसेंबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली. सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील काम करणाऱ्या सफाई कर्मचारी सरस्वती डोंगरे ( वय 36) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 8 डिसेंबर रोजी डोंगरे या कामावर गेल्या. सकाळी पावणे सातच्या सुमारास त्या रुग्णालयातील अपघात विभागातील टॉयलेटमध्ये कचरा गोळा करण्यासाठी गेल्या. मात्र तेव्हा त्यांना तेथे असलेली कचऱ्याची बादली नेहमीपेक्ष खूपच जड वाटली. म्हणून त्यांनी ती नीट उघडून पाहिली असता, त्यात एका काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये नवजात अर्भक आढळले.
प्रेमसंबंधांतून लग्नाआधीच गरोदर राहिल्याने केलं कृत्य
त्यांनी या घटनेची माहिती तातडीने तेथील वरिष्ठांना दिली. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांना तेथे बोलावण्यात आले. त्यांनी त्या बाळाची नीट तपासणी केली, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. बराच वेळ कोणाचंही लक्ष न गेल्याने त्या नवजात बालिकेचा मृत्यू झाला. याप्रकरणाची माहिती सायन पोलिसांना दिल्यानंतर बाळाच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि इतर बाबींच्या आधारे त्या बालिकेला सोडून जाणाऱ्या महिलेचा शोध घेतला. अखेर पोलिसांनी रिझवाना हिला अटक केली. रिझवाना हिचे एका तरूणाशी प्रेमसंबंध होते, त्यातूनच ती गरोदर राहिली. मात्र त्यांचं लग्न झालेलं नव्हतं, लग्नापूर्वीच गरोदर राहिलेल्या रिझवानाने बदनामीच्या भीतीपोटी तिच्या नवजात मुलीला टॉयलेटमध्येच सोडले आणि ती तिथून निघून गेली. सध्या रिझवाना पोलिसांच्या ताब्यात असून पुढील कारवाई सुरू आहे.