सावधान! मुंबईत 8 हजार सिमकार्ड दुसऱ्याच्या नावावर, 13 अटकेत, मुंबई पोलिसांना मोठं यश
मुंबई पोलिसांनी एका अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे, जी बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड विकत घ्यायची. पण सिमकार्डचा आकडा ऐकून आणि मोडस ऑपरेंडी पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
मुंबई : मुंबई पोलिसांनी एका धक्कादायक प्रकरणाचा उलगडा केला आहे. बातमी वाचून तुम्हीही हैराण व्हाल. बनावट ओळखपत्र वापरून सिमकार्ड घेतल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 2,197 सिमकार्ड, चार लॅपटॉप आणि 60 मोबाईल जप्त केले आहेत. मुंबई पोलिसांनी व्हीपी रोड, डीएन नगर, मलबार हिल, सहार आणि बांगूर नगर पोलीस स्टेशन परिसरात एकाच वेळी छापे टाकून कारवाई केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सिमकार्ड विक्रेते, एजंट आणि कॉल सेंटर मालकांचा समावेश आहे. दूरसंचार विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. अटक केलेल्या सर्व व्यक्तींवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
एकाच व्यक्तीचा वेगवेगळ्या अँगलने आणि वेगवेगळ्या रूपातील फोटो वापरून शेकडो सिमकार्ड जारी करण्यात आली आहेत. ज्याचा वापर गुन्ह्यासाठीही केला जाऊ शकतो. या माहितीनंतर मुंबईतील पाच वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली होती. त्यानंतर दूरसंचार विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ज्या ठिकाणी ही सिमकार्डे दिली गेली, त्या सर्व ठिकाणी जाऊन तपासणी केली.
मुंबई पोलिसांकडून 13 आरोपींना अटक
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाच्या तपासादरम्यान 5 एफआयआर नोंदवण्यात आले असून, या प्रकरणांमध्ये 13 आरोपींना अटकही करण्यात आली आहे. अधिक चौकशी केली असता मुंबईतील 62 जणांना त्यांच्या छायाचित्रांचा वापर करून एकूण 8500 सिमकार्ड देण्यात आल्याचे समोर आले आहे. अटक केलेल्यांपैकी 12 दुकानदार हे सिमकार्ड विकणारे आहेत. एका व्यक्तीकडे कॉल सेंटर आहे, जो या दुकानदारांकडून सिमकार्ड विकत घेत असे.