मुंबई | 29 नोव्हेंबर 2023 : वडील गेल्यानंतर गावी जाऊन त्यांचे अंत्यविधी आटोपून पहाटे घरी परत येणाऱ्या एका इसमाला धाक दाखवत त्याला लुटल्याची धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात मुंबई घडली होती. अखेर याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कसून शोध घेत चौघांना अटक केली आहे. मात्र इतर दोघे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवर (GMLR) नाहूर स्टेशनजवळ हा धक्कादायक प्रकार घडला होता. पहाटेच्या सुमारासा झालेल्या या लुटीने एकच खळबळ माजली. अखेर पोलिसांनी त्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.
अशी केली चोरी
कदम असे पीडित इसमाचे नाव आहे. भांडुप पूर्व येथील रहिवासी असलेल्या पीडित कदम गेल्या आठवड्यात रायगड येथून बसने घरी परत येत होते. ऐरोली ब्रिजवर पहाटे च्या ते उतरले, पण एवढ्या पहाटे बस किंवा रिक्षा काहीच न मिळाल्याने ते घरी चालत निघाले होते. नाहूर आणि मुलुंड पूर्व भागात येणाऱ्या नानेपाडा रोडवरून चालत असताना त्यांना काही माणसे त्यांच्याकडे टक लावून पाहत असल्याचे दिसले.
या प्रकरणातील तपास अधिकारी, पीएसआय गणेश सानप यांनी स्पष्ट केले, “या संपूर्ण भागात गेल्या काही काळापासून अनेक गुन्हेगारी कारवाया सुरू आहेत. त्यामुळे यापैकी अनेक प्रॉपर्टी ओनर्सनी तेथे सुरक्षा रक्षक नेमले आहेत, परंतु यापूर्वी काहींना मारहाण करण्यात आली होती. अनोळखी लोकांनी त्यांच्यावर वार केले, त्यामुळे आता तेथील सुरक्षारक्षक गणवेश घालत नाहीत. त्याच रक्षकांनी चालत येणाऱ्या कदम यांना पाहिले, आणि त्यांना ते दरोडेखोर असल्याचा संशंय आल्याने ते (सुरक्षारक्षक) त्याच्यावर ओरडू लागले. या सगळ्या प्रकारामुळे कदम घाबरले आणि नाहूर स्टेशनच्या दिशेने पळू लागले.
टेम्पोतून उतरले दरोडेखोर
मात्र तेथे एक टेम्पो त्यांचा कदम यांचा पाठलाग करू लागला. काही वेळानंतर टेम्पो कदमच्या शेजारीच थांबला आणि सहा जण गाडीतून उतरले. त्यापैकी काहींचा हातात रॉड होते. त्यातील दोघांनी कदम यांना पकडलं आणि शस्त्रांचा धाक दाखवत, त्याची झडती घेण्यास सुरूवात केली. कदम यांच्या गळ्यातील चेन, मोबाईल फोन, एटीएम कार्ड, रोख रक्कम आणि त्यांच्या हातातील स्मार्टवॉच हे दरोडेखोरांनी लुटलं. त्यानंतर त्यांनी कदम यांना जमीनीवर ढकलून दिलं आणि ते सगळे तिथून पसार झाले.
नवघर पोलिसांत दाखल केली तक्रार
या घटनेच्या काही दिवसांनंतर कदम यांनी नवघर पोलिसांकडे जाऊन संपूर्ण घटनाक्रम कथन केला , त्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ताराम गिरप यांनी पीएसआय सानप यांच्याकडे हे प्रकरण सोपवले. त्यानंतर एका पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. कदम यांनी दिलेल्या वर्णनानुसार, पोलिसांनी टेम्पोचा शोध सुरू केला. मात्र त्याचा क्रमांक पोलिसंकडे नव्हता, तसेच गुन्हा घडला त्या ठिकाणी कोणताही सीसीटीव्ही नव्हता. तसेच नाहूर स्टेशन, आणि आसपासच्या परिसरातही सीसीटीव्ही लावलेला नसल्याने गुन्हेगारांचा शोध घेणे हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान होते.
अखेर पोलिसांनी शक्य तितक्या सीसीटीव्हींमधून फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. भांडुपच्या सोनापूर परिसरात एक तशाच वर्णनाचा टेम्पो दिसल्यावर पोलिसांना पहिला सुगावा मिळाला. मात्र त्यामध्ये कोणीच नव्हते. पोलिसांनी त्यावर नजर ठेवण्यास सुरूवात केली. अखेर, जवळपास तीन दिवसांनी त्यांना एक टोळी टेम्पोजवळ येताना दिसली. टेम्पोत बसून ते पुढे निघाले, तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. गोवंडी येथील गौतम नगर येथे जरावेळ थांबून, टेम्पोतील लोकांनी पुन्हा प्रवास सुरू केला. अखेर वाशी टोल नाक्यावर पोलिसांनी तो टेम्पो रोखला आणि त्यातील चौघांना अटक केली. मात्र उर्वरित दोघेजण पळून गेले.
आरोपींची ओळख पटवून वाहन केले जप्त
अली राजा मिया अली (३४), झिशान सिद्दीकी (२१), मोहम्मद अशरफ खान (२४) आणि निसार मुश्ताक अली खान (२०) अशी आरोपींची नावे असून, त्या सर्वांना पोलिसांनी अटक केली. त्यापैकी अली हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.या दरोड्यातील इतर दोघे अद्याप फरार असून पोलिसा त्यांचा शोध पोलिसांनी त्यांची सुमारे ३ लाख रुपये किमतीची गाडी जप्त केली आहे. मात्र त्यांनी कदम यांच्याकडून चोरलेल्या वस्तू मिळवण्यात पोलिसांना अद्याप यश मिळालेले नाही. सर्व आरोपी सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.