सोसायटीत खेळणाऱ्या चिमुकल्याला ज्येष्ठ नागरिकाची मारहाण, भेदरलेला मुलगा गंभीर आजारी
सोसायटीत खेळणं लहान मुलाला खूप महागात पडलं. सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या त्या मुलाला एका ज्येष्ठ नागरिकाने एवढी मारहाण केली की तो चिमुकला आजारीच पडला.
गोविंद ठाकूर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 4 डिसेंबर 2023 : आजकाल मुलांना खेळायला फारशी जागा उरलेली नाही, त्यामुळे बऱ्याच वेळा मुलं सोसायटीच्या आवारात खेळत असतात. पण बोरिवलीमध्ये एका सोसायटीत खेळणं लहान मुलाला खूप महागात पडलं. सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या त्या मुलाला एका ज्येष्ठ नागरिकाने एवढी मारहाण केली की तो चिमुकला आजारीच पडला. ज्येष्ठ नागरिकाने दिलेला ओरडा आणि त्याने केलेली मारहाण याचा त्या मुलाने प्रचंड धसका घेतला. तो एवढा घाबरला की अनेक दिवस घराबाहेरच पडला नाही. सध्या तो गंभीर आजारी असून त्याला उपचारांसाठी डॉक्टरांकडे नेण्यापर्यंतची वेळ आली आहे. या प्रकारानंतर पीडित मुलाच्या पालकांनी बोरिवली पोलिसांत धाव घेत त्या ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध एफआयआर नोंदवला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
सोसायटीत खेळले म्हणून ओरडले
मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पश्चिमेला असलेल्या चिकूवाडी जवळील एका सोसायटीमध्ये 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास काही मुलं खाली खेळत होती. नेहमीप्रमाणे त्यांचा खेळ रंगला होता. मात्र त्यांच्या खेळण्याचा त्याच सोसायटीमधील एका ज्येष्ठ नागरिकाला त्रास होऊ लागला. त्याने त्या मुलांना गाठलं आणि इथे खेळायचं नाही असं सांगत तिथून हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही मुलांनी त्यांचं काही ऐकलं नाही आणि ते सगळे परत तिथेच खेळू लागले.
यामुळे तो ज्येष्ठ नागरिक संतापला आणि त्यांनी आठ वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण केली आणि भरपूर ओरडाही दिला. या सगळ्यामुळे तो मुलगा प्रचंड घाबरला, भेदरलाही. त्याला एवढी भीती वाटली की त्याने घाबरून पँटमध्ये लघवीही केली.
पालकांनी विचारला जाब पण…
हे सगळं त्याने घरी येऊन आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्याचा पालकांनी त्या वृद्धाचं घर गाठून जाब विचारला. त्याच्या घरच्यांनी कशीबशी माफी मागितली, पण त्या वृद्ध नागरिकाचं वागणं काही बदललं नाही.
दुसरीकडे त्या माणसाच्या ओरडण्यामुळे तो छोटा मुलगा एवढा भेदरला , एवढा घाबरला की त्याला मानसिक ताण आला. त्या भीतीपायी तो कितीतरी दिवस घराबाहेरच पडला नाही. त्याच्या मनात भीती निर्माण झाली. घराबाहेर पडणंही बंद केलं. त्याचा आजार एवढा वाढला की शेवटी पालकांना त्याला डॉक्टरांकडे नेऊन त्याच्यावर उपचार सुरू करावे लागले. यामुळे त्याचे पालक प्रचंड संतापले आणि त्यांनी बोरिवली पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्या ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.