मुंबई : जेष्ठ नागरिकांबाबत गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. काल कांदिवलीत जेष्ठ नागरिक महिलेला केअरटेकरने लुटल्याची घटना उघडकीस आली होती. ही ताजी असतानाच आज सोन्याच्या माळीसाठी केअरटेकर जेष्ठ नागरिक असलेल्या डॉक्टरची हत्या केल्याचे उघड झाले. या घटनांमुळे जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेता प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सांताक्रूझ पश्चिम येथे राहणाऱ्या 85 वर्षीय डॉक्टरची केअरटेकरने हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने केवळ नाईक यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाची रुद्राक्षाची सोन्याची माळ चोरुन नेली. आरोपीने इतर कोणत्याही मौल्यवान वस्तूला हात लावला नाही.
मुरलीधर पुरषोत्तम नाईक हे सांताक्रूझ पश्चिम येथील सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील हेलेना अपार्टमेंट्समध्ये पत्नीसह राहत होते. नाईक हे पेशाने डॉक्टर होते. त्यांचा केअरटेकर लग्न समारंभासाठी रजेवर गेला होता. म्हणून कुटुंबाने 1 मे रोजी कृष्णा मानबहादूर पेरियार याला HACH मॅनपावर एजन्सीमार्फत कामावर ठेवले होते. पेरियारला एजन्सीने कोणतीही योग्य पोलीस पडताळणी न करता कामावर घेतले होते. एका ज्येष्ठ नागरिक जोडप्याच्या सुरक्षेसाठी एजन्सीवर विश्वास ठेवला होता. नाईक यांच्या मृत्यूला एजन्सीही जबाबदार आहे, असा आरोप नाईक यांच्या जावयाने केला आहे.
घटनेच्या दिवशी नाईक यांची दुसऱ्या बेडरूममध्ये झोपली होती. तर आरोपी पेरियार हा नाईक यांच्या खोलीत झोपला होता. सकाळी 8 वाजता मोलकरीण नेहमीप्रमाणे घरी आली. यानंतर ती मालकाला चहा देण्यासाठी त्यांच्या खोलीत गेली तर समोरील दृश्य पाहून तिला धक्काच बसला. मालक बेडवर पडले होते, त्यांचे हात-पाय बेडशीटने बांधलेले होते. तिने लगेच बाजूच्या खोलीत झोपलेल्या मालकिणीला कळवले. यानंतर डॉक्टर आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
सोमवारी पहाटे 3 ते 5 च्या दरम्यान नाईक यांची हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, परंतु कुटुंबाने केलेल्या आरोपांच्या आधारे पोलिसांनी पेरियारविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आरोपीने इतर कोणत्याही मौल्यवान वस्तूंना हात न लावता नाईक यांनी घातलेली सोन्याची रुद्राक्षाची माळ चोरली, हत्येमागील हेतू केवळ पेरियार म्हणून अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस सखोल तपास करत आहेत.