तोंडातून फेस, डोके आणि मनगट उंदरांनी कुरतडलेले; प्लॅस्टिकच्या पिशवीत 2 वर्षाच्या मुलाचा…
पहाटे पाच वाजता मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन आला. फोनवरील माहिती ऐकताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहचताच जे दृश्य दिसले त्याने पोलिसांच्याही काळजात धस्स झाले.
मुंबई : मुंबईतील माहिम परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी एका प्लास्टिकच्या पिशवीत दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. सायन-माहिम लिंक रोडच्या बाजूला प्लास्टिकच्या पिशवीत मुलाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या तोंडातून फेस येत होता. उंदरांनी डोके आणि उजवा मनगट चावला होता. याप्रकरणी शाहूनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्लास्टिकच्या पिशवीत दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी तात्काळ मुलाला सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी मुलाला तपासून मृत घोषित केले. यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या मुलाला इथे कोणी फेकले? मुलाचे पालक कोण आहेत? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
पहाटे पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला अन्…
बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला एक फोन आला. सायन-माहिम लिंक रोडवर एका प्लास्टिकच्या पिशवीत एका मुलाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पिशवीत मुलाचा मृतदेह असल्याचे पोलिसांना आढळून आले. मुलाच्या तोंडातून फेस येत होता. त्याचे डोके आणि उजवे मनगट उंदरांनी कुरतडले होते. पोलिसांचे पथक तात्काळ मुलासह सायन येथील लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मात्र डॉक्टरांनी बालकाला पाहताच मृत घोषित केले.
शाहूनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
प्राथमिक तपासानंतर मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. यानंतर शाहूनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली.