बड्या कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून लोकांना गंडा, ‘असा’ झाला आरोपीचा भांडाफोड
ऑनलाईन नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांना गंडा घालायचा. पण अखेर पोलिसांनी जाळ्यात अडकवलाच.
गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई : बड्या कंपन्यांमध्ये ऑनलाईन नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका आरोपीला मुंबईतील दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी ऑनलाईन नोकरीसाठी फॉर्म भरणाऱ्या लोकांना हेरायचा. मग मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या हफ्त्यांमध्ये त्यांच्याकडून लाखो रुपये घ्यायचा आणि त्यांना जॉईनिंग लेटरही देत असे. पण जेव्हा ती व्यक्ती नोकरीसाठी त्या पत्त्यावर जायची तेव्हा या नावाची कोणतीही कंपनी नाही किंवा कुणीही जॉईन न झाल्याचे कळायचे.
एका तरुणाच्या तक्रारीनंतर सायबर सेलची कारवाई
दहिसर येथे राहणाऱ्या फिर्यादीसोबतही अशी फसवणूक झाली होती. दोन मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या बहाण्याने आरोपींनी सुमारे चार लाख रुपये ऑनलाईन घेतले होते. तक्रारदाराला एक जॉईनिंग लेटरही देण्यात आले होते. यामध्ये कंपनीचा पत्ता चेन्नई असा लिहिला होता. तक्रारदार त्या पत्त्यावर गेला असता त्याची फसवणूक झाल्याचे त्याला कळले. त्या कंपनीत कोणतीही नियुक्ती झालेली नाही.
आरोपीच्या दिल्लीतून मुसक्या आवळल्या
फिर्यादीने तात्काळ मुंबईत येत दहिसर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. दहिसर पोलिसांच्या आयटी सेलच्या पथकाने आरोपीला दिल्लीहून अटक करून मुंबईत आणले. रवीकुमार अशोककुमार शर्मा असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सध्या आरोपीने नोकरीच्या बहाण्याने किती लोकांची फसवणूक केली आणि यात किती लोकांचा सहभाग आहे, याचाही तपास पोलीस करत आहेत.