पाच वर्षापासून प्रेमसंबंध, सोबत येण्यास नकार दिल्याने प्रियकराने केले ‘असे’ कृत्य
महिलेचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध होते. प्रियकर महिलेला पतीला सोडून त्याच्यासोबत येण्यासाठी सांगत होता. मात्र महिला त्याच्यासोबत जायला तयार नव्हती. मग प्रियकराने शक्कल लढवली.
मुंबई : प्रेम हे आंधळे असते, असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. किंबहुना जोडीदाराची मर्जी राखण्यासाठी आणि त्याला आपला जीवनसाथी बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. पण अलीकडच्या काळात या प्रेमाने रक्तरंजित स्वरूप घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मायानगरी मुंबईत घडलेल्या धक्कादायक घटनेने याची प्रचिती आणून दिली आहे. विवाहित प्रेयसीला वारंवार विनंती करूनही ती आपल्या सोबत पळून जायला तयार नाही. या रागातून प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या मुलाचे अपहरण केले. तसेच वेळीच सोबत न आल्यास मुलाचे बरे-वाईट करण्याचीही धमकी दिली.
आपल्या मुलाला प्रियकरानेच पळवून नेल्याचे सुरुवातीला माहित नसल्यामुळे प्रेयसीने आधीच पोलीस ठाणे गाठले होते. त्यानंतर प्रियकराने फोन कॉल केल्याने प्रेयसी पोलिसांसोबत मुलाचा थांगपत्ता लावण्यासाठी गेली होती. अखेर मुलाचा शोध लागण्याबरोबरच महिलेच्या अनैतिक संबंधाचा आणि तिच्या प्रियकराने रचलेल्या अपहरण नाट्याचा पर्दाफाश झाला.
आरोपी प्रियकरामुळेच कळले मुलाचे लोकेशन
आरोपी प्रियकर रिपन याने महिलेला फोन कॉल केला, त्यावेळी स्वतःचे लोकेशन देखील सांगितले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रेल्वेने नाशिक गाठले. कारण रिपन याने महिलेला नाशिकमध्येच येण्यास सांगितले होते. मुलाचे बरेवाईट होण्याची धमकी दिल्यामुळे महिला पोलिसांसोबत नाशिकला जाण्यास तयार झाली होती. तिने रिपन याला पोलीस तक्रारीबाबत कुठलीही कल्पना येऊ दिली नाही.
याच आधारे पोलिसांनी नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर सापळा रचला आणि मुलाचे अपहरण करणाऱ्या रिपन याला रेल्वेच्या पुलावरून ताब्यात घेतले. त्याने प्रेयसीला सोबत येण्यासाठी हे सगळे अपहरण नाट्य रचल्याची कबुली पोलिसांपुढे दिली आहे.
आरोपीला नाशिक रेल्वे स्टेशनवरून घेतले ताब्यात
लहान मुलाचे काही बरेवाईट होण्याआधी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी शांतीनगर पोलिसांनी दोन विशेष टीम तयार केल्या होत्या. या दोन्ही पथकांनी वेळीच नाशिक रेल्वे स्टेशन गाठले आणि तेथे गाफील अवस्थेत उभ्या राहिलेल्या आरोपीची गठडी वळली. आरोपी रिपन हा नाशिक रेल्वे स्टेशनच्या ब्रिजवर उभा होता.
पोलिसांनी तक्रारदार महिलेला पुढे करीत आरोपी रिपन याच्यासोबत बोलण्यास सांगितले. याचदरम्यान पोलिसांनी अत्यंत शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरु आहे.