Mumbai Crime : कूकने शिक्षिकेच्या हातात दिली वीजेची तार आणि… ‘त्या’ अमानुष कृत्याने शहर हादरलं !
मुंबईतील एका कूकच्या अमानुष कृत्याने संपूर्ण शहर हादरलं. तो ज्या घरात वर्षानुवर्षे काम करत होता, त्याच घराच्या मालकिणीला त्याने अतिशय क्रूर शिक्षा दिली. या घटनेनंतर तो फरार झाला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
मुंबई | 20 सप्टेंबर 2023 : मुंबईतून एक अत्यंत अजब आणि तेवढीच धक्कादायक घटना (mumbai news) समोर आली आहे. तेथे एक स्वयंपाक करणारा इसम, कूक नाराज होता, कारण त्याची मालकीण त्याला छोट्याशा गोष्टीवरून ओरडली होती. मात्र या गोष्टीचा बदला घेण्यासाठी त्याने तिला अतिशय क्रूर शिक्षा दिली. त्या कूकने त्याच्या मालकिणीला थेट वीजेच्याच तारेने करंट (electric shock) दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.पीडित महिला जेव्हा झोपली होती, तेव्हा तो कूक वीजेची तार घेऊन तिथेच उभा होता. तिला जाग येताच त्याने तिला वीजेच्या तारेने झटके दिले. पीडित महिला शिक्षिका असल्याचे समजते. दरम्यान या अमानुष कृत्यानंतर आरोपी फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी येथील एका इमारतीत रविवारी दुपारी ही संपूर्ण धक्कादायक घटना घडली. पीडित महिला एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तर राजकुमार सिंग ( वय २५) असे आरोपीचे नाव आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून पीडितेच्या घरी कूक म्हणून काम करत होता. त्याच्याकडे घराची दुसरी चावीदेखील होती.
डुप्लीकेट किल्ली वापरून शिरला घरात
तीच चावी वापरून रविवारी तो घरामध्ये घुसला. पीडित महिला झोपलेली असताना कूकने तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. तो हातात वीजेची तार धरूनच उभा होता. पीडितेला जाग येताच त्याने तिच्या दोन्ही हातामध्ये वीजेची तार दिली, तेव्हा विद्युत प्रवाह सुरूच होता, ज्यामुळे तिला शॉक बसला व ती जखमी झाली. तिच्या हातात वीजेची तार असताना आरोपी तिला सतत विचारत होता ‘ सांग आता कसं वाटतंय ?’ असे त्या महिलेने पोलिसांना सांगितले.
त्या शिक्षिकेच्या जबाबानुसार, आरोपीने तिला मारहाण तर केलीच पण तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. तो माझा गळा दाबण्याचा प्रयत्न करत होता. हाणामारी दरम्यान तिचं डोकं जमीनीवर जोरात आपटलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे या घटनेच्या वेळी पीडितेचा ११ वर्षांचा मुलगाही तेव्हा घरी होता, तो दुसऱ्या खोलीत झोपला होता. मात्र आरडा-ओरडा ऐकून तो बाहेर आला , तेव्हा कूक पीडितेला वीजेचे झटके देत होता.
मात्र आरोपी आपल्या मुलावरही हल्ला करेल या भीतीने पीडितेने तिच्या मुलाला खोलीतच लपून राहण्यास सांगितले. पीडितेच्या सांगण्यानुसार, थोड्या वेळाने तिने आरोपीची माफी मागितल्यावर त्याने हे क्रूर कृत्य थांबवले आणि तो तेथून फरार झाला. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.