Mumbai Crime : शिक्षिकेला वीजेच्या तारेने शॉक देणारा कूक अखेर जेरबंद, पोलिसांनी केली कारवाई
घटनेच्या दिवसापासूनच आरोपी फरार होता. गेल्या चार दिवसांपासून तो सतत लोकेशन बदलत होता, असे पोलिसांनी सांगितले. अखेर हे अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले.
मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : ज्या घरात काम केले, त्याच घरातील मालकीण छोट्याशा गोष्टीवरून ओरडली याचा राग मनात ठेवून तिला वीजेचा शॉक देणाऱ्या (electric shock) आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधम आरोपीला (accused arrested) पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहे. आंबोली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राजकुमार सिंग (वय २५) असे आरोपीचे नाव असून गेल्या आठवड्यात रविवारी ही धक्कादायक घटना घडली होती. तेव्हापासूनच तो फरार झाला होता. तर पोलिस मागावर आहेत हे समजताच गेल्या चार दिवसांपासून तो सतत त्याचे लोकेशन बदलत होता, अशी माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडत महिला (वय 42) ही शिक्षिका असून आरोपी सिंग हा गेल्या दोन वर्षांपासून तिच्या घरी कूक म्हणून काम करत होता. दुपारी 12 ते 2 आणि संध्याकाळी 6.30 ते 7.15 अशा दोन शिफ्ट्समध्ये तो काम करायचा. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो जो स्वयंपाक करत होता, त्याचा दर्जा, चव चांगली नसल्याबद्दल त्याची मालकीण त्याला ओरडली होती. त्या दोघांमध्ये या मुद्यावरून भांडणही झाले होते, असे पोलिसांनी सांगितले.
या सर्व प्रकारामुळे तो कूक चांगलाच संतापला, त्याच्या मनात राग खदखदत होता. त्याने या गोष्टीचा बदला घेण्याचे ठरवले. अखेर 17 सप्टेंबर रोजी तो पुन्हा त्या महिलेच्या घरात घुसला. त्याच्याकडे घराची दुसरी चावी होती. तीच चावी वापरून तो घरामध्ये घुसला. तेव्हा पीडित महिला आणि तिला मुलगा घरात होते, ते वेगवेगळ्या खोलीत झोपले होते. आरोपी सिंग याने रबरचे ग्लोव्ह्ज घातले आणि वीजेची तार घेऊन तो महिलेच्या बेडरूममध्ये शिरला. त्यानंतर त्याने विजेच्या सॉकेटमध्ये वायर घातली आणि तिला विजेचा शॉक देण्याचा प्रयत्न केला.तिच्या हातात वीजेची तार असताना आरोपी तिला सतत विचारत होता ‘ सांग आता कसं वाटतंय ?’ असे पीडित महिलेने पोलिसांना सांगितले होते.
त्यानंतर त्याने पीडितेला खाली खेचले आणि तिचे डोके जमिनीवर आदळले. त्याच वीजेच्या तारेचा वापर करून त्याने तिचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला आणि तिचा मुलगा तिला वाचवण्यासाठी तिच्या बेडरूममध्ये गेला. मात्र आरोपी आपल्या मुलावरही हल्ला करेल या भीतीने पीडितेने तिच्या मुलाला खोलीतच लपून राहण्यास सांगितले.
त्यानंतर अचानक सिंग याने पीडित महिलेची माफी मागण्यास सुरूवात केली आणि तो लागलीच तेथून फरार झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेन कसाबसा नातेवाईकांना फोन लावला आणि सगळा प्रकार कथन केला. ते तातडीने तिच्या घरी आले आणि तिला वैद्यकीय उपचारांसाठी डॉक्टरांकडे नेले. त्यानंतर त्यांनी सिंग यालाही फोन करत जाब विचारला. मालकीण दोन दिवसांपासून मला ओरडत होती, रागावत होती, आणि त्यामुळेच आपण हे कृत्य केले असे आरोपीने सांगितले. त्याने पुन्हा त्या सर्वांची माफी मागितली आणि या प्रकरणाबाबत पोलिसांना सांगू नका अशी विनंतीदेखील केली.
या सर्व घटनेनंतर फरार झाला होता आणि सतत त्याचे ठिकाण बदलत होता. त्याचा शोध घेऊन गुरुवारी रात्री त्याला अखेर अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली, असे डीसीपी कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितले.