Mumbai Crime : डॉक्टर तुम्हीसुद्धा ? सोशल मीडियावरून तिघींना भुलवलं, लग्नाच्या आमिषाने जवळ केलं; नंतर… तिघींची आयुष्य उद्ध्वस्त !
सोशल मीडियावरून ओळख काढत आधी मैत्री करायची आणि नंतर फसवणूक.. अशा अनेक केसेस घडलेल्या आपण ऐकत असतो. त्याबद्दल हळहळ व्यक्त करतो आणि सोडून दत. पण एका डॉक्टरनेही अशाच माध्यमातून तीन आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे समोर आले आहे.
गोविंद ठाकुर , टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : सोशल मीडियाचं वेड भलंतच वाढायला लागलं आहे. समोरच्या माणसाशी बोलायाला वेळ नाही, पण मोबाईलवरून व्हर्च्युअल जगात फेरफटका मारायला, तिथल्या लोकांशी गप्पा मारायला रात्रंदिवस पुरत नाही. पण हे आभासी जग आहे, आणि आभस हे फक्त खोटेच असतात. मृगजळासारखे.. त्याच्या मागे पळून पळून छाती फाटते, पण हातात काहीच येत नाही. उरते ती फक्त फसवणूकीतून झालेली निराशा.
सोशल मीडियावरून (social media) ओळख करून, मैत्री वाढवून लोकांना फसवण्यात (fake promise) आल्याच्या अनेक केसेस आपण ऐकल्या असतील, पण असा गुन्हा खरोखर मुंबईत घडला आहे, आणि त्यामध्ये सामील आहे एक डॉक्टर. सोशल मीडियावर तीन मुलींशी मैत्री करून, त्यांना लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार आणि फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
आमिष दाखवून तिघींचे आयुष्य केले उद्ध्वस्त
योगेश भानुशाली असे आरोपी डॉक्टरचे नाव असून त्याने तिघीजणींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. सोशल मीडियावरून आधी ओळख काढायची, मग गोड बोलून मैत्री करायची, प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं, लग्नाच आमिष दाखवत नको ते सर्व करायचं आणि नंतर सोडून द्यायचं, असा हीन उद्योग डॉक्टर बऱ्याच काळापासून करत होता.
एक महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली होती. याप्रकरणी तो अजूनही तुरुंगात आहे. त्याच दरम्यान आणखी एका महिलेने पोलिस स्टेशन गाठले आणि याच डॉक्टरविरोधात बलात्कार आणि फसवणुकीची तक्रार नोंदवत गुन्हा दाखल केला.
इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आरोपी डॉक्टरने आधी माझ्याशी मैत्री केली. हळूहळ आम्ही प्रेमात पडलो. त्याने मला लग्नाचे वचनही दिले होते. आम्ही अनेक वेळा जवळ आलो. त्याने माझ्याकडून पैसे, दागिने बरंच काही घेतलं. पण हळूहळू तो मला टाळू लागला. लग्नाचा विषय काढल्यालवर त्याने मला थेट धुडकावून लावलं. लग्नच करायचं नाही सांगत थेट नकार दिला, असे पीडित महिलेने पोलिसांना सांगितले.
या गुन्ह्यासंबंधी मालवणी पोलीस तपास करत असताना, काही वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीनेही याच डॉक्टराविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचा हा पॅटर्न असल्याचे लक्षात आले.
एकाच आरोपीने तीन मुलींवर अत्याचार करून त्यांना फसवल्याचे समोर आल्यानंतर आता मालवणी पोलीस पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. या डॉक्टरने लग्नाच्या बहाण्याने आणखी किती महिलांना ब्लॅकमेल केले आहे, सध्या याचा तपास पोलीस करत आहेत.
अन्य एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध सर्व पुरावे गोळा करण्यात येत असून लवकरच न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर त्याला पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात येईल, असे मालवणीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी सांगितले.