आधी फेसबुकवर सेना अधिकारी असल्याचे सांगत मैत्री करायचा, मग स्वस्तात वस्तू देतो सांगत लुटायचा !
तो सोशल मीडियावर आर्मीचा अधिकारी असल्याचे भासवत लोकांनी मैत्री करायचा. मग आर्मीच्या कँटिनमधून स्वस्तात वस्तू मिळवून देण्याची बतावणी करत पैसे लुटायचा.
मुंबई / गोविंद ठाकूर : आर्मीच्या कँटिनमधून स्वस्तात वस्तू मिळवून देतो सांगत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तोतया सेना अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. विनोद गायकवाड असे आरोपीचे नाव असून, नवी मुंबईतील बेलापूर परिसरातून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने फेसबुकवर फेक आयडी दाखवून आतापर्यंत 56 जणांना गंडा घातला आहे. आरोपींकडून पोलिसांनी 12 वेगवेगळ्या कंपन्यांचे सिमकार्ड आणि 2 मोबाईल फोन, बनावट सेना आणि हवाई दलाचे पट्टे आणि ओळखपत्र जप्त केले आहे. आरोपी विनोद गायकवाड याच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
आधी मैत्री करायचा मग गंडा घालायचा
आरोपी फेसबुकवर दीपक सुर्वे या नावाने सेना आणि हवाई दलाचा आयडी टाकून लोकांशी मैत्री करायचा. नंतर लष्कराच्या कँटीनमधून स्वस्त आणि दर्जेदार पदार्थ मिळवून देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करत असे. बोरिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी महिलेला फेसबुकवर दीपक सुर्वे नावाच्या आर्मी आणि एअर फोर्सच्या अधिकाऱ्याकडून आर्मीच्या कॅन्टीनमधून स्वस्त आणि चांगला माल मिळतो अशी माहिती मिळाली होती.
बोरिवलीतील एका महिलेच्या फसवणुकीनंतर आरोपीचा भांडाफोड
पीडितेने या फेसबुक आयडीची मैत्री स्वीकारली. पीडित महिलेला चांगल्या दर्जाचे फ्रीज हवे होते. तोतया अधिकारी दीपक सुर्वेने महिलेशी संपर्क साधून खात्यावर 40 हजार पाठवल्यास फ्रीज डिलिव्हरी मिळेल, असे सांगितले. पीडितेने बनावट आर्मी मॅनच्या खात्यावर 40 हजार रुपये फ्रीजसाठी पाठवले. परंतु पैसे पाठवल्यानंतर एक आठवड्यापासून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात आले.
महिलेने बोरीवली पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणुकीबाबत तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने प्रकरणाचा तांत्रिक तपास करत आरोपी नवी मुंबईतील बेलापूर येथून बेड्या ठोकल्या.