Mumbai Crime : जावयासह मुलीला घरी बोलावलं, त्यानंतर जे घडलं ते वाचून उडेल थरकाप.. त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं ?
मुलीने केलेला प्रेमविवाह तिच्या घरच्यांना मंजूर नव्हता. त्यामुळे ते नाराज झाले होते. अखेर मुलीच्या वडिलांनी तिला आणि जावयाल घरी येण्याचे आमंत्रण दिले. पण त्यानंतर ते पुन्हा कुणाला दिसलेच नाहीत. त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं ?
ब्रिजभान जैसवार, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : प्रेम.. खूप संदुर भावना, अनेकजण प्रेमात पडतात. पण त्यापैकी फारच कमी लोकांच प्रेम यशस्वी होतं. काहीजण प्रेमासाठी वाट्टेल ते करू शकतात. प्रसंगी घरच्यांच्या विरोधात जाऊनही लग्न करतात. घरचे समजूतदार असतील तर त्यांना स्वीकारतातही. पण आजही समाजात अशी माणसं, अशी कुटुंबं आहेत की ते त्यांच्याविरोधात पडलेलं एकही पाऊल सहन करू शकत नाही. आपल्याच मुलांच्या विरोधात ते जातात.
अशीच एक घटना मुंबईतही घडली. गोवंडी येथे राहणाऱ्या तरूणीने प्रेमविवाह (love marriage) केला. मात्र तो तिच्या घरच्यांना पसंत नव्हता. त्यानंतर त्यांनी असं काही केलं ज्यामुळे संपूर्ण शहर हादरलं. एका इसमाने त्याच्या पोटच्या मुलीची आणि जावयाची हत्या (crime news) केल्याचे उघड झाले आहे. पोलीसांनी दुहेरी हत्या प्रकरणाची उकल केली. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील, तिचा भाऊ, त्याचा मित्र या तिघांना अटक केली. त्याशिवाय तीन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
घरून फोन आला म्हणून ती पतीसह गावाहून निघाली पण..
गुलनाज खान ( वय २०) आणि करण चंद्र ( वय २२) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुलनाज ही मुंबईची रहिवासी असून गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिने करण याच्याशी प्रेमविवाह केला. दुसऱ्या धर्मातील मुलाशी लग्न केल्यामुळे गुलनाजचे कुटुंबिय खूपच नाराजा होते. तिच्या वडिलांना हे लग्न मंजूर नव्हते. लग्नानंतर गुलनाज आणि करण हे उत्तर प्रेदशमधील गावी रहात होते.
काही दिवसांपूर्वी गुलनाजला तिच्या वडिलांचा, गोरा खान ( वय ५० ) यांचा फोन आला आणि त्यांनी तिला व जावयला घरी येण्याचा आमंत्रण दिले. वजीलांचा फोन आल्यामुळे ती खुश झाली. आपला राग गिळून वडिलांनी बोलावलं, याचा अर्थ आता ते नाराज नाहीत, असं तिला वाटलं. आनंदाच्या भरात ती पती करणसोबत गावाहून निघाली खरी पण… त्यानंतर ती कुणालाच पुन्हा दिसली नाही.
गुलनाज आणि करण घरी आल्यानंतर तिचे वडील गोरा, तिचा भाऊ सलमान खान (२२) आणि त्याचा मित्र मोहम्मद कैफ नौशाद खान यांनी त्यांची हत्या केली. त्यांनी करण व गुलनाज दोघांच्याही गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांचा जीव घेतला. मात्र आपल्यावर कोणालाही संशय येऊ नये म्हणून जावई करण याचा याचा मृतदेह मानखुर्द भागातील एका विहीरीत फेकून दिला. तर मुलगी गुलनाज हिचा मृतदेह खारघर येथे फेकला.
असा झाला गुन्ह्याचा उलगडा
शनिवारी एका विहीरात तरूणाचा मृतदेह सापडल्याची माहिती देणारा फोन गोवंडी पोलिसांना आला. त्या तरूणाचा गळा चिरून खून झाल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आले. तर त्यानंतर दोनच दिवसांनी पनवेल पोलिसांना खारघर येथे झु़डुपांत एका तरूणीचा मृतदेह सापडला. तिचीही, सेम अशाच पद्धतीने हत्या झाल्याचे समोर आले. बऱ्याच तपासानंतर पोलिसांना त्या दोघांमधील कनेक्शन समोर आले . करण आणि गुलनाज यांचेच ते मृतदेह होते. गुलनाजच्या वडिलांनीच, त्यांचा मुलगा व त्याच्या मित्रासह त्या दोघांच्या हत्येचा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. तसेच यामध्ये तीन अल्पवयीन मुलांनीही मदत केल्याचे समोर आले. अखेर पोलिसांनी मुलीचे वडील गोरा खान ( ५० ), मुलगा सलमान खान (२२) आणि त्याचा मित्र मोहम्मद कैफ नौशाद खान यांना अटक केली. तसेच तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी गोवंडी पोलीस पुढील तपास करत आहे.