मुंबई | 18 डिसेंबर 2023 : पती-पत्नीच्या नात्याच विश्वास सर्वात महत्वाचा. एकमेकांवर विश्वास असेल तर दोघे मिळून कोणत्याही वादळाला सामोरे जाऊ शकतात, कठीण परिस्थितीमधून मार्ग काढू शकतात. संकटाचा सामना करण्यासाठी एकमेकांची साथ हवी आणि एकमेकांवर गाढ विश्वास हवा. मात्र त्याच विश्वासाचा घात केला, तर संसाराचा क्षणात खेळखंडोबा होऊ शकतो आणि सगळंच विस्कटू शकतं.
मुंबईत अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिथे एका पतीने त्याच्याच पत्नीचा विश्वासघात केला. आणि स्वत:च्याच पत्नीला मित्रांच्या स्वाधीन केले. ही केस सांगली पोलिस स्टेशनमधून पंतनगर पोलिस स्टेशनला ट्रान्सफर करण्यात आल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. पतीच्या संमतीनेच त्याच्या दोन मित्रांनी आपल्यावर सामूहिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने नोंदवली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर पूर्वेकडील रमाबाई कॉलनी एरियामध्ये 9 आणि 10 डिसेंबर दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. पीडित महिला 23 वर्षांची असून त्या दिवशी रात्री तिचा पती तिला एका शाळेजवळच्या भागात घेऊन गेला आणि तिच्या संमतीशिवाय तिच्याशी शरीरसंबंध ठेवत तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नव्हे तर 10 डिसेंबर रोजी सकाळी 5:30च्या सुमारास पीडितेचा पतीने तिला त्याच भागातील एका निर्माणाधीन इमारतीच्या परिसरात नेले आणि तेथे दोन मित्रांशी तिची ओळख करून दिली. त्याचे हे दोन मित्र या इमारतीत आपल्याला एक फ्लॅट मिळवून देतील पण त्याबदल्यात तुला त्यांना ‘काहीतरी’ द्यावे लागेल, असे आरोपी पतीने त्याच्या पत्नीला सांगितले.
घरभाडं भरण्यासाठी पैसे हवेत म्हणून पत्नीला मित्रांच्या स्वाधीन केलं
पीडित महिलेच्या पतीला घराचं भाडं भरण्यासाठी पैसे हवे होते. तुझ्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवू दिले तर आम्ही दोघेही तुला प्रत्येकी 5 हजार रुपये देऊ, असे आश्वासन मित्रांनी आरोपीला दिले. आरोपी पतीने त्यांची ही मागणी मान्य केली आणि तो पत्नीला घेऊन ठरलेल्या ठिकाणी आला. त्यानंतर पतीनेच तिचे दोन्ही हात बांधून ठेवले आणि त्याच्या दोन्ही मित्रांनी आळीपाळीने आपल्यावर अत्याचार केला, असे पीडितेने पोलिसांना सांगितले.
या प्रकारामुळे भेदरलेल्या, उद्ध्वस्त झालेल्या पीडित महिलेने तातडीने तिच्या माहेरी, सांगलीला धाव घेतली आणि कुटुंबियांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी सांगली येथे पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आणि नंतर ही केस मुंबई येथे ट्रान्सफर करण्यात आली.
तिघांना अटक
पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत पीडितेचा पती आणि त्याचे मित्र, अशा तिघांनाही तत्काळ अटक केली. त्याच्या मित्रांपैकी एक जण बँजो पार्टी वर्कर आहे तर दुसरा आरोपी हा शालेय शिक्षण पूर्ण न करताच बाहेर पडला. पीजित महिलेचा पती हा बेरोजगार असून केवळ पैशांसाठीच त्याने त्याच्या पत्नीला मित्रांच्या स्वाधीन केले, असे पंतनगर पोलिसांनी सांगितले. दरम्यान या घटनेमुळे पंतनगर परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण आहे.