मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : प्रेम ही (love) अतिशय सुरेख भावना आहे. पण सर्वांनाचं त्याचं प्रेम मिळतं असं नाही. काही जणांना प्रेमाची साथ आयुष्यभर मिळते, तर काहींचा प्रवास अर्धवट थांबतो. काहींना प्रेमात नकारही मिळतो. पण हा नकार पचवणही तितकंच महत्वाचं आहे. आपल्याला जी व्यक्ती आवडे, तिलाही आपण आवडलोच पाहिजे, असा अट्टाहास प्रेमात उपयोगाचा नाही. पण सगळ्यांनाच नकार पचवता येत नाही. त्यातूनच एखादी दुर्घटना किंवा नकोसा प्रकारही घडू शकतो.
असाच एक प्रकार मुंबई शहरातही घडला. चार वर्षांची ओळख, त्यानंतर ते एकत्र रिलेशनशिपमध्येही होते. मात्र काही काळानंतर तरूणीला त्या तरूणासोबत राहण्यात रस नव्हता. पण तिचा नकार न पचवता आल्याने तरूणाने तिच्यावर थेट हल्लाच केला. जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिलाच त्रास देण्यासाठी त्याचे हात कसे धजावले असा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे.
मुंबईतील या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. 15 ऑक्टोबरच्या रात्री एका 28 वर्षांच्या तरूणाने 21 वर्षांच्या पीडितेवर जीवघेणा हल्ला केला. त्याने तिच्या गळ्यावर वार करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पीडित तरूणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित आरोपी आणि 21 वर्षीय पीडित तरुणी 2019 पासून एकमेकांना ओळखतात आणि ते एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही काळानंतर त्या मुलीला त्याच्यासोबत नात्यात राहण्याची इच्छा नव्हती. तिने त्याल तसं सांगितलंही , मात्र त्या तरूणीचा नकार त्याला पचवता आला नाही. हे नातं कायम राखलं नाही तर तुझे व्हिडीओ ऑनलाइन पोस्ट करेन, अशी धमकी त्याने तरूणीला दिली. आरोपी आणि पीडित तरूणी हे दोघेही जवळपास रहायचे असे समजते.
15 ऑक्टोबर रोजी त्या दोघांनीही शेवटचं भेटायचं ठरवलं. त्याप्रमाणे ते भेटले, त्यांनी अंधेरीतील एका हॉटेलमध्ये रूमही बूक केली. मात्र तेथे त्या तरूणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप लावण्यात आला आहे. त्यानंतर दोघेही तेथून एका रिक्षात बसून भांडूपच्या दिशेने निघाले. गांधीनगर जवळ त्या तरूणाने तरूणीच्या गळ्यावर वार करत तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरूणीला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांनंतर तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
या घटनेनंतर पीडित तरूणीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. भांडूप पोलिसांनी आरोपी तरूणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकत अटक केली.
28 वर्षीय तरुणावर कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 376 (बलात्कार), 363 (अपहरण), 323 , 504 आणि 50 या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून पुढील चौकशी करण्यात येत आहे.