सीसीटीव्ही फुटेजचा एक शॉट, महिन्याभराचा पाठलाग आणि.. घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या अटकेचा थरार वाचा !
चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या जिगर नावाच्या व्यक्तीने घरफोडीची तक्रार करत पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर हे प्रकरण सर्व प्रथम उजेडात आलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची माहिती काढत महिनाभर त्याच्यावर नजर ठेवली होती. त्याच्याविरोधात 20 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.
मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : अतिक्रमण आणि घरफोडीच्या 20 पेक्षा (House breaking) अधिक गुन्ह्यांप्रकरणी वॉन्टेड असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराचा महिन्याभरापेक्षा अधिक काळ पाठलाग केल्यानंतर त्याला अटक करण्यात पंत नगर पोलिसांना यश मिळालं आहे. चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या जिगर नावाच्या व्यक्तीने घरफोडीची तक्रार करत पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर हे प्रकरण सर्व प्रथम उजेडात आलं होतं. जिगर कोठारीच्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने त्याच्या घरात घुसून सुमारे ६ लाख रुपयांचा ( theft of 6 lakh) माल लुटला होता. मात्र त्याची इमारत जुनी असून लवकरच री-डेव्हलपमेंटला जाणार आहे. त्यामुळे त्या बिल्डींगमध्ये सीसीटीव्ही वगैरे नसल्याने घरात कोणी घुसल्याचा पुरावा दिसत नव्हता.
मात्र त्या बिल्डींगपासून सुमारे 30 ते 40 फूट अंतरावर असलेला सीसीटीव्ही कॅमेरा हा पोलिसांसाठी उपयुक्त ठरला. तक्रारदार कोठारीच्या बिल्डींगच्या गेटचा थोडासा भाग त्यामध्ये टिपला गेला. तेथील फुटेजची बरेच आठवडे तपासणी केल्यानंतर एक इसम बिल्डींगच्या गेटमधून आत शिरताना आणि अवघ्या १५ मिनिटांनी तेथून बाहेर पडताना दिसला, असे याप्रकरणाचा तपास करणारे पीएसआय सागर खोंद्रे यांनी सांगितले.
असा केला तपास
पंतनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविदत्त सावंत यांनी पोलिसांचे एक पथक तयार केले, त्याचे नेतृत्व खोंद्रे करत होते. घाटकोपर पूर्वेला ९० फूट रोडवर असलेल्या फिर्यादी. कोठारीच्या इमारतीच्या गेटपासून सुरुवात करून संशयित आरोपीने वापरलेल्या मार्गांचा शोध पोलिसांच्या पथकाने सुरू केला. 30 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक केल्यानंतर संशयित कारमध्ये बसून वाशीच्या दिशेने जात असल्याचे त्यांना समजले. ती कार सांगलीतील, मिरज येथील एका व्यक्तीच्या नावे रजिस्टर्ड होती. वाशी, खालापूर, तळेगाव आणि खेड शिवापूर टोल नाक्यावर सीसीटीव्ही तपासून आणि टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांशी बोलल्यानंतर ती कार सांगलीच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पुढील तपासासाठी तातडीने एक पथक सांगलीला रवाना करण्यात आले.
घरफोडीचे अनेक गुन्हे
सांगलीतील स्थानिक पोलिसांनी तपास केला असता, त्या व्यक्तीच्या नावे घरफोडीशी संबंधित अनेक गुन्हे दाखल असल्याचे समजले. संशयित आरोपी हा सांगली शहराबाहेर एका शेताजवळ वसलेल्या मोठ्या घरात रहात असल्याची माहिती समोर आली आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याच्या घराबाहेर सापळा रचण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. लोकेश रावसाहेब सुतार असे आरोपीचे नाव असून तो अट्टल (घरफोडी) गुन्हेगार आहे. तो एक कुशल कार्पेंटर ( सुतारकाम करणारा) असून त्याच्या नावावर अनेक गुन्हे आहेत.
पोलिसांनी त्याची पार्श्वभूमी तपासली असता, घरफोडीचे काही व्हिडीओही त्यांना मिळाले. (घरफोडीचा) गुन्हा करताना तो फक्त, एक स्क्रू ड्रायव्हर घएऊन जात आसे. घराचे दार, लॉकर,सेफ्स, कपाटं उघडण्यासाठी तो फक्त याच साधनाचा वापर करायचा आणि लाखोंचा माल लुटून पळून जायचा, असे पोलिसांनी सांगितले. घरफोडीनंतर काही काळ तो ऑफलाइन रहायचा, जास्त बाहेरही पडायचा नाही. त्याच्या घरातून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग (exit) होते आणि तेथे सर्वत सीसीटीव्ही लावलेले होते. म्हणजे एका बाजूने पोलिस घुसले तर दुसऱ्या बाजूने पळून जायची सोय केलेली होती, असेही पोलिसांनी सांगितले.
अखेर ५-६ दिवस त्याच्यावर बारीक नजर ठेवल्यावर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बाहेर पडण्याचे सर्व मार्ग रोखून धरले. आणि मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून सुतार याला बेड्या ठोकत अटक केली. आपण 2013 पासून असे अनेक गुन्हे केल्याची कबुली सुतारने चौकशीदरम्यान दिली. आणि अलीकडच्या काळात किमान 35 घरे फोडली असावीत असेही त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, नोंदीनुसार त्याच्याविरोधात महाराष्ट्र आणि कर्नाटकात २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.