Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : बादलीतील ‘त्या’ मुलीच्या मृतदेहाचं रहस्य अखेर उलगडलं.. बिहारमध्ये लपलेल्या आरोपीला पोलिसांनी केलं जेरबंद !

आई-वडील कामाला गेल्यानंतर घरात मोठ्या भावासोबत राहणारी चिमुरडी अचानक गायब झाली. बरीच शोधाशोध करूनही तिचा तपास लागला नाही. मात्र अचानक परिसरातून दुर्गंधी येऊ लागल्याने सर्वांनी तिकडे धाव घेतली आणि समोरचं दृश्य पाहून...

Mumbai Crime : बादलीतील 'त्या' मुलीच्या मृतदेहाचं रहस्य अखेर उलगडलं.. बिहारमध्ये लपलेल्या आरोपीला पोलिसांनी केलं जेरबंद !
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 11:11 AM

भिवंडी | 21 सप्टेंबर 2023 : शहरातील एका चिमुरड्या मुलीच्या मृतदेहाचे (minor girl murder) रहस्य उलगडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी थेट बिहार गाठून आरोपीला अटक केली आहे.अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करून मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून ठेवण्यात आला होता. याप्रकरणाचा अथक तपास करणाऱ्या पोलिसांनी बिहारच्या मधुबनी येथून एका 32 वर्षीय इसमाला ताब्यात घेत (man arrested from bihar) त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. भिवंडीत गेल्या आठवड्यात हा गुन्हा घडला होता.

भिवंडी शहरातील फेणेगाव परिसरातील धापसी पाडा येथील एका पत्र्याच्या चाळी मध्ये ही दुर्देवी घटना घडली होती. गेल्या आठवड्यात 13 सप्टेंबर रोजी पीडत मुलगी बेपत्ता झाली होती. पीडित मुलगी तेथे तिचे पालक आणि भावासोबत रहात होती. गुन्हा घडला त्या दिवशी तिचे आई-वडील गोदामामाध्ये कामाला गेले होते. मुलगी तिच्या ९ वर्षांच्या मोठ्या भावासोबत घरातच होती. मात्र संध्याकाळी आई-बाबा परत आल्यावर त्यांनी मुलीबद्दल विचारले असता सकाळपासून ती बेपत्ता असल्याचे आढळले. बराच शोध घेतल्यानंतरही ती न सापडल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

अखेर सापडला मृतदेह

पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून लगेचच शोध मोहिम सुरू केली. त्यानुसार दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी नजीकच असलेल्या वऱ्हाळा तलावामध्ये सुद्धा पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले, मात्र त्या चिमुरडीचा काहीच पत्ता लागला नाही. दरम्यान परिसरातील नागरिकांना खूप दुर्गंधी जाणवू लागल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात कसून शोध घेतला असता एका चाळीतील खोलीमध्ये प्लास्टिकच्या बादलीत तिचा मृतदेह कोंबलेल्या अवस्थेत आढळला होता. ही तीच खोली होती जेथे संशयित आरोपी रहात होता. गुन्हा केल्यानंतर तो तेथून फरार झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

असा लागला आरोपीचा शोध

त्या मुलीने घातलेला ड्रेस आणि तिच्या चपला यावरूनच तिची ओळख पटवण्यात आली. पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तीन पथके तयार करत गुन्हेगाराचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्या खोलीत राहणारा इसम बिहारमधील मधुबनी यथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांतर्फे मिळाली. अखेर बिहार पोलिसांच्या मदतीने त्यांनी ३२ वर्षीय आरोपीला जेरबंद केले.

आरोपी हा काही दिवसांपूर्वीच भिवंडी येथे स्थायिक झाला होता, आणि तो एकटाच रहायचा असे पोलिसांनी सांगितले. आरोपीने पीडित मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याच्या खोलीत बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. मंगळवारी आरोपीला भिवंडी येथे आणण्यात आले असून पुढील चौकशीनंतरच अधिक माहिती मिळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.