Mumbai Crime : गणरायाची विसर्जन मिरवणूक पहायला गेल्या, पण… वृद्ध महिलेचा कसा झाला मृत्यू ?
कुठे घडली ही घटना ? शहरात विसर्जनाचा मोठा उत्साह होता, ढोल ताशे, लेझीमच्या गजरात सर्व भाविक बाप्पाच्या नावाचा जयघोष करत होते. पीडित महिलाही उत्साहाने गणपतीची विसर्जनाची मिरवमूक पहात होती. मात्र तेवढ्यात एक अघटित घटना घडली आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला.
मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : गणरायाचे विसर्जन होऊन दोन दिवस झाले तरी अजूनही भाविकांना आपल्या लाडक्या दैवताची आठवण येतच आहे. दहा दिवस लाडक्या गणरायाची सेवा करून, मोदक लाडवांचा प्रसाद दाखवून अखेर अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मात्र विसर्जनाच्या या सोहळ्याला एका दुर्दैवी घटनेमुळे गालबोट लागले. वीजेच्या तारेचा शॉक लागून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. नालासोपारा येथे ही धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
जयंती म्हात्रे (वय 74) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या नालासोपारा पश्चिमेकडील नाळा गावातील देवीच्या वाडी समोर असेलल्या गायवाडी येथे रहात होत्या. गुरूवारी अनंत चतुर्दशीनिमित्त गणरायाची विसर्जन मिरवणूक सुरू होती. जयंती म्हात्रे या देखील ही मिरवणूक पाहण्यासाठी जात होत्या. मात्र त्याचवेळी रस्त्यात वीजेची तार तुटून पडली होती. त्याच तारेचा म्हात्रे यांना शॉक लागला आणि त्यांचा मृत्यू झाला. महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावरील पथदिव्याचा शॉक सर्किट झाल्याने वीजप्रवाह विद्युत तार रस्त्यावर पडली होती. त्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला.
महावितरणाच्या बेजबाबदार कारभारामुळे हा मृत्यू झाला असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकरणी महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर तसेच कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू
गणेश विसर्जनादरम्यान मुंबईत आणखी एक दुर्दैवी घटना घडली. एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. हसन शेख असं त्याचं नाव असून तो गुरुवारी दुपारी चौपाटीवर किनाऱ्याजवळ पडलेला दिसला. त्याला लगेच घटनास्थळी असलेल्या रुग्णवाहिकेतून जवळच्या पालिकेच्या कुपर रुग्णालयात नेण्यात आलं. अंवार वीज पडल्याने तो जखमी होऊन कोसळला. रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले.