Lalit Patil : ललित पाटीलला कसं पकडलं ? पत्रकार परिषदेत पोलीसांकडून महत्वाचे खुलासा
मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत अखेर ललित पाटीलला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्वाचे खुलासे केले. ललित पाटीलसह १५ आरोपीना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : आम्ही ड्रग्स रॅकेटप्रकरणी आत्तापर्यंत १४ जणांना अटक केली. त्यानंतर काल, याप्रकरणी १५ व्या आरोपीला, ललित पाटीलला (lalit patil) अटक केली. त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली असून त्याच्या चौकशीत बरीच माहिती समोर येईल, असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. पाटील याच्या अटकेनंतर तर मुंबई पोलीसांनी घेतलेल्या पत्रकार परिषेदत अनेक महत्वपूर्ण खुलासे केले.
गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला अखेर अटक करण्यात आली. बुधवारी दुपारी त्याला अंधेरी कोर्टासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी महत्वाची माहिती दिली. पाटीलला अटक कशी केली, पोलिस केव्हापासून त्याच्या मागावर होते, यासंदर्भातही त्यांनी खुलासे केले.
ड्रग्ज रॅकेट प्रकरणात ललित गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. अखेर काल रात्री साकीनाका पोलिसांनी कारवाई करत बंगळुरूमध्ये त्याच्या मुसक्या आवळत अटक केली. ललित पाटील हा पोलिसांच्या हाती लागल्याने ड्रग्स प्रकरणातील अनेक बड्या धेंडांची नावे बाहेर येण्याची शक्यता आहे.
ऑगस्टपासून तपास सुरू
या गुन्ह्याचा तपास ऑगस्ट महिन्यापासून सुरू करण्यात आला होता. तेव्हा अन्वर सय्यद या पहिल्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. तेव्हा त्याच्याकडून १० ग्रॅम ड्रग्स जप्त करण्यात आले. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे आत्तापर्यंत १४ आरोपींना अटक करत सुमारे १५० किलो (एमडी) ड्रग आम्ही जप्त केले. त्याची किंमत अंदाजे ३०० कोटी रुपये होती, असे पोलिस सहआयुक्तांनी सांगितले.
तपास यंत्रणांना बरीच माहिती मिळाली, त्या आधारे ललित पाटील याला बंगळुरू आणि चेन्नई यांच्या दरम्यान एका ठिकाणाहून अटक करण्यात आली. तो ससून रुग्णालयातून पळाला, त्याबाबत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे पोलीस त्याचा तपास करत आहेत.
पळून गेल्यावर ललित पाटीलने कुठून , कसा प्रवास केला याची चौकशी करण्यात येईल. या प्रकरणाचा तपास सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे जास्त भाष्य करणे योग्य नाही. या प्रकरणी सर्व दिशेने तपास करण्यात येणार असून त्यातून बरीच माहिती समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
तसेच साकीनाका पोलिसांनी याप्रकरणी अतिशय चांगली कामगिरी केली आहे, पोलीस आयुक्तांकडून त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले, असेही ते म्हणाले.
मी पळालो नाही, मला पळवलं
दरम्यान ललित पाटील याला आज अंधेरी कोर्टासमोर हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने त्याला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. आज दुपारी पाटील याला न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर पाटीलने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले अशी माहिती वकिलांनी दिली. तसेच पुणे पोलिसांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोपही त्याने केला. मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं असा गंभीर आरोपही त्याने केल्याचे वकिलांनी सांगितलं. मला पळवण्यात कोणाकोणाचा हात आहे हे सर्व सांगणार असंही तो म्हणाला, अशी माहिती समोर आली आहे.