हॉटेल चालवण्यावरुन आणि पैशावरुन वाद झाला, मॅनेजरने परफेक्ट प्लान करुन मालकाला हेरले, पण…
हॉटेल चालवण्यावरुन आणि पैशावरुन हॉटेल मालक आणि मॅनेजरमध्ये वाद झाला. मग मालकाला धडा शिकवण्यासाठी मॅनेजरने जे केले त्यानंतर तो थेट तुरुंगातच गेला.
गोविंद ठाकूर, मुंबई : मुंबईतील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी कुर्ला रोडवर असलेल्या हॉटेल वीरा रेसिडेन्सीचे मालक अनूप शेट्टी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. एअरगनमधून फिल्मी स्टाईलमध्ये 4 राउंड फायर केल्यानंतर गोळीबार करणाऱ्यांनी जखमी हॉटेल मालकाचे त्याच्याच इनोव्हा कारमधून अपहरण केले. ही घटना 24 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली. गोळीबार आणि अपहरणाची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला. अपहरण आणि गोळीबाराच्या घटनेनंतर 13 तासांच्या आत एमआयडीसी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली.
मुंब्रा येथून व्यावसायिकाची सुटका
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल वीरा रेसिडेन्सीचे मालक अनूप शेट्टी यांचे अपहरण करण्यासाठी 50 लाखांची खंडणी मागितली होती. दोन आरोपी मुंब्रा रेती बंदर परिसरात 50 लाखांची खंडणी घेण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मुंब्रा रेती बंदर येथून 2 जणांना, शाहपूर येथून 2 आरोपींना आणि कडवली परिसरातून 3 आरोपींना अटक केली.
हॉटेल आणि पैशावरुन मॅनेजर आणि मालकामध्ये होता वाद
मुख्य आरोपी स्वप्नील अवकीरकर हा हॉटेल मॅनेजर म्हणून कामाला होता. हॉटेल चालवण्यावरून आणि पैशावरून मालक आणि व्यवस्थापक यांच्यात वाद झाला. बदला घेण्यासाठी मुख्य आरोपीने त्याच्या भावांसह अपहरण आणि खंडणीचा कट रचला. अपहरण करताना आरोपींनी कोणीही हस्तक्षेप करू नये म्हणून एअरगनने हवेत चार राऊंड गोळीबार करून हॉटेल मालकाचे त्याच्याच इनोव्हा गाडीतून अपहरण केले.
स्वप्नील अवकीरकर, वैभव जानकर, विजय अवकीरकर, चंद्रकांत अवकीरकर, सागर गांगुडे, मनोज लोखंडे आणि गुरुनाथ वाघे यांना अटक करण्यात आली. हे सर्वजण शहापूर नाशिकचे रहिवासी आहेत. आरोपींपैकी स्वप्नील, विजय, वैभव आणि चंद्रकांत हे सख्खे भाऊ आणि नातेवाईक आहेत. आरोपींकडून 2 एअर गन, 2 रामपुरी चाकू, 8 मोबाईल, 1 दुचाकी, इनोव्हा आणि या अपहरण आणि गोळीबारात वापरलेली 40 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.