मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 : मुंबईतील गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नाहीये. चोरी, दरोडा, पाकिटमारी, लूटमार अशा गुन्ह्यांच्या एक ना अनेक घटना दररोज कानावर पडत असतात. मात्र त्यामुळे नागरिकांच्या डोक्याचा ताप वाढला असून ते जीव मुठीत धरून जगत आहेत. चोरांना, गुन्हेगारांना रोखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. त्याचदरम्यान मुंबई पोलिसांनी कारवाई करत तीन गुन्हेगारांना अटक केली आहबे. हे तीनही तरूण गर्दीने भरलेल्या बसमध्ये चढून, संधीचा फायदा घ्यायचे आणि प्रवाशांचा मोबाईल लुटून पसार व्हायचे.
शोएब मोबीन खान (21), बैतुल्ला कलामुद्दीन खान (36) आणि नादिर शेख (38) या तिघांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण 32 मोबाईल्स जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. हे तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी गर्दीने भरलेल्या बसमध्ये चढायचे आणि गर्दीचा फायदा घेत मोबाईल पळवायचे.
पोलिसांनी प्रथम शोएब आणि बैतुल्लाला पकडले. मात्र त्यांनी चोरलेले फोन हे नादिर याच्याकडे विकल्याची माहिती चौकशीतून मिळाली. तर नादिरने तेच फोन बादारात पुन्हा स्वस्त विकल्याचे कबूल केले, असे पोलिसांनी नमूद केले. नादिरच्या घरावर छापा टाकल्यानंतर पोलिसांनी तब्बल 32 मोबाईल जप्त केले. भारतीय दंड संहितेच्या कलम 379 (चोरी) आणि 411 या अंतर्गत या तिघांना अटक करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुकानातील लाखोंचा माल चोरल्याप्रकरणी तिघांना अटक
तर दुसर्या प्रकरणात, मुंबई पोलिसांनी खारच्या पश्चिम उपनगरात एका दुकानात 63 लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी केल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली. रविवारी पोलिसांनी गुलाब गणेश मारवाडी उर्फ अक्षय (25), सूर्या मणि नाडर (21) आणि संजय केदारे (19) यांना अंधेरी आणि जुहू भागातून अटक केली.
या तिघांनी गेल्या आठवड्यात खार पाली रोडवरील एका दुकान फोडले आणि आत घुसून त्यांनी लॉकरमध्ये ठेवलेले 63 लाख रुपयांहून अधिक किमतीचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने चोरले, अशी माहिती पोलिसांनी दिली. दुकानमालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत शोध सुरू केला होता.
त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत तीनही चोरांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. तसेच पोलिसांनी 40 लाखांहून अधिक किमतीचे चोरीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे. या तिघांविरोधात कलम 380 (चोरी) आणि भारतीय दंड संहितेच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.