मुंबईतील निर्यातदाराकडून किरगिस्तानच्या कंपनीला 17 कोटींचा गंडा, कंपनीच्या संचालकासह तिघांवर गुन्हा दाखल
परदेशी कंपनीशी व्यावसायिक करार करत त्यांची करोडोंची फसवणूक केली. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करत तिघांना अटक केली आहे.
मुंबई : साखर निर्यातीच्या बहाण्याने किरगिस्तानच्या कंपनीसह दिल्लीतील व्यावसायिकाची 17 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आरोपींनी साखर निर्यात करण्यासाठी किरगिस्तानच्या कंपनीसोबत करार केला. त्यासाठी त्यांनी आगाऊ रक्कमही घेतली. मात्र मालाचा पुरवठाच केला नाही. तसेच आगाऊ दिलेली रक्कमही परत करण्यास टाळाटाळ केली. यानंतर दिल्लीतील आयात-निर्यात कंपनीचे मालक अमीर अली यांनी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली. काशिनाथ पांडुरंग जाधव, पार्थ काशिनाथ जाधव आणि विकास गायकवाड अशी अटक आरोपींची नावे आहेत.
काय आहे प्रकरण?
किरगिझस्तानमधील व्यापारी इस्कंदर उल्लो यांनी दिल्लीतील व्यावसायिक आणि त्यांचे मित्र आमिर अली यांना आपण साखर निर्यातदाराच्या शोधात असल्याचे सांगितले. यानंतर अली यांनी त्यांचा गुडगाव येथील मित्र रोहित शर्माच्या ओळखीच्या मुंबईतील काशिनाथ जाधव यांच्याशी संपर्क केला. काशिनाथ जाधव यांची मुंबईत रॉयल अॅग्रो मार्ट लिमिटेड नावाची कंपनी आहे. मध्यस्थीच्या ओळखीने किरगिझस्तान येथील केजी इन्व्हेस्टने जाधव यांच्या रायल अॅग्रो मार्ट लिमिटेडशी करार केला.
काशिनाथ हे रॉयल अॅग्रो मार्टचे अधिकृत प्रतिनिधी, तर पार्थ आणि माधुरी मोरे हे कंपनीचे संचालक असल्याचे अली आणि इस्कंदर यांना सांगण्यात आले. आरोपींनी अली आणि उल्लो यांना साखरेचा साठाही दाखवला. 15 दिवसांत 12,000 मेट्रिक टन साखर किरगिझस्तान कंपनीला निर्यात करू असे सांगितले. यासाठी 50 टक्के रक्कम आगाऊ देण्यास सांगत उर्वरीत 50 टक्के मालाच्या निर्यातीनंतर देण्याचे ठरले. यानंतर जाधव यांनी 19 मे 2022 रोजी अली आणि इस्कंदर यांना खेरदी-विक्री करार पाठवला.
करारानुसार आगाऊ रक्कम घेतली मात्र खेप पाठवली नाही
करारानुसार, केजी इन्व्हेस्टने 20 मे 2022 रोजी रॉयल अॅग्रो कंपनीला 24 कोटी रुपये आगाऊ रक्कम दिली. मात्र भारत सरकारच्या साखर निर्यातीच्या धोरणामुळे साखर निर्यात होऊ शकली नाही. यानंतर किरगिझस्तानच्या कंपनीने करार रद्द करत रक्कम परत करण्यास सांगितले. रॉयल मार्टने तीन हफ्त्यात रक्कम परत करण्याचे कबुल केले. त्यानुसार पहिला हफ्ता 7 कोटी रुपये 10 सप्टेंबर 2022 रोजी परत केला. मात्र उर्वरीत 17 लाख रुपये परत केले नाहीत.
यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अली यांनी जाधव आणि रॉयल अॅग्रो मार्ट यांच्या विरोधात मुंबईच्या परकीय व्यापार विभागाच्या अतिरिक्त संचालकांकडे तक्रार करण्यात आली. यानंतर जाधव यांना परदेशी कंपनीचे पैसे तात्का परत करण्याचे आदेश देण्यात आले, मात्र जाधव यांनी हे आदेश पाळले नाहीत. यानंतर अली आणि इस्कंदर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक केली. जाधव यांच्यावर याआधी 9 फसवणुकीचे गुन्हे तर गायकवाड याच्यावर एक गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. आरोपींविरोधात कलम 406, 409, 420 आणि 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.