मुंबई | 4 ऑक्टोबर 2023 : रस्त्यावर गाडी, ट्रक चालवताना अनेक जण वेगाची मर्यादा पाळत नाहीत. झपकन पुढे जाण्याच्या मोहाने गाडी वेगात चालवली जाते, एखादा कट मारला जातो. मात्र यामध्ये दुसऱ्या व्यक्तीचे नुकसान होऊ शकते, प्रसंगी अपघात होऊन जीवावर बेतू शकते, याची कोणालाच काहीही पडलेली नसते. अशा परिस्थितीत कट मारला म्हणून समोरच्याला थांबवून वाद घालून, प्रसंगी मारामारी करण्याचे अनेक प्रसंग हायवेवर घडत असतात. अशा वेळी संतापाच्या भरात केलेली एखादी कृती नंतर पश्चातापास कारणीभूत ठरू शकते. पण तेव्हा हातातून वेळ गेलेली असते.
असंच एक भांडण मुंबई अहमदाबाद महामार्गावर पेटलं आणि त्यामध्ये निष्पाप व्यक्तीला जीव गमवावा लागला. कारला ट्रकचा किरकोळ धक्का लागल्याने खरंतर हा वाद सुरू झाला पण त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. चौघा जणांनी चालकास बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू (driver died) झाला. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. याप्रकरणी चौघा आरोपींविरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक ( 4 arrested) करण्यात आली आहे.
क्षुल्लक कारणावरून पेटला वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकीशोर कुशावह असे मयत ट्रक चालकाचे नाव आहे. तर सबेस्टीन, उत्सव शर्मा, विक्की बारोट, विवेक पवार अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावं आहेत. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई हद्दीत मालजीपाडा जवळ एस पी ढाबा समोर, गुजरात लेन वर एका गॅस टँकरची मारुती सुझुकी कारला धडक बसली. खरंतर ही अगदी किरकोल घटना होती. त्यामध्ये कारचे फारसे नुकसानही झाले नव्हते ना कोणाला लागले.
पण कारमधील चौघा जणांना याचा फारच राग आला आणि त्यांनी ट्रक चालकाकडे नुकसान भरपाईची मागणी केली. पण त्याने पैसे देण्यास नकार दिला. तुम्ही माझ्याविरोधात गुन्हा दाखल करा आणि इन्शुरन्सच्या पैशांतून नुकसान भरपाई घ्या, असे ट्रकचालकाने सांगितले. मात्र हे ऐकताच आरोपींना राग आला आणि संतापाच्या भरात त्यांनी ट्रकच्या काचेवर दगडफेक केली. तसेच ट्रकचालक कुशावह याला ठोसे, बुक्के मारत बेदम मारहाण केली. यामध्ये त्याच्या छातीला बराच मार लागल्याने तो गंभीर जखमी होता. अखेर त्याचा मृत्यू झाला. आजूबाजूच्या लोकांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली. या प्रकरणात मयताच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले .